थांबा ! "त्या' निर्जनस्थळी अंधार होताच जाणे धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

कळमना मार्गावरील लकी बिअरबारच्या जवळ असलेल्या ओसाड, निर्जन स्थानी रात्री आवागमन करणाऱ्यांसाठी फारच धोकादायक असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले.

कामठी (जि.नागपूर) :  कळमना मार्गावरील ओसाड, निर्जनस्थळी सायंकाळी वर्गमित्रासह गप्पा मारत असलेल्या अल्पवयीन मुलीला चाकूच्या धाकावर झुडपात नेऊन तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता.21) घडली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. कळमना मार्गावरील लकी बिअरबारच्या जवळ असलेल्या ओसाड, निर्जन स्थानी रात्री आवागमन करणाऱ्यांसाठी फारच धोकादायक असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले.

 

 
लाठीकाठी घेऊनच बाहेर पडावे लागते
रात्री बाहेर पडायचे असल्यास लाठीकाठी हातात घेऊन निघावे लागते. सायंकाळी सहानंतर या मार्गावर ये-जा करणे कठीणच नाही तर जिवावर बेतण्यासारखे असते. काम लवकरात लवकर आटोपून घरी परत येण्याचे प्रयत्न करीत असत असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले. येथे राहणाऱ्या 50 वर्षीय श्रीमती कळमकर यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास अशीच घटना घडण्याची वेळ आली होती. मात्र चाहूल समजताच त्या भागातील लोक धावून आल्यामुळे संधीच्या शोधात असलेल्या असामाजिक तत्त्वांनी येथून पोबारा केला. मुलगा व मुलगी तेथून सुखरूप निघून गेले. या भागात झाडाझुडपांमुळे चोरटे व असामाजिक तत्व वावरत असतात.

 

आणखी वाचा   : मध्यरात्री सुरू होते खोदकाम, कामगारांच्या अंगावर कोसळला ढिगारा

आरोपींची पार्श्‍वभूमी
गुन्ह्यातील सराईत आरोपीने नुकतेच एक वर्षाआधी 7 ऑक्‍टोबर 2018 ला घटनास्थळाच्या नजीकच्या रनाळा-भिलगाव रोडवर येरखेडा ग्रा.पं. चे माजी सदस्य अनिल पाटील यांना चाकूच्या धाकावर अंगठी, सोन्याची चेन, मोबाईल आदी कागदपत्रांसह एकूण 59 हजारांच्या मुद्देमालासह लुटले होते. तसेच 17 जुलै 2016 ला बाबा अब्दुल्लाशाह दरगाह परिसरात शेजारी महिलेशी भांडण सुरू असताना मध्ये पडलेल्या पती मोशिन सरदार खान यांच्यावर सराईत आरोपीने चाकूने सपासप वार केले होते.
आणखी वाचा : नागपूरकरांनो ऐका, लवकरच स्वच्छ होणार आपली नागनदी

दोन आरोपींची कारागृहात रवानगी
कामठी : तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता. 21) रात्री घडली. पीडिताच्या कुटुंबीयांनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही तासांतच आरोपींचा शोध लावला. तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये मोनू उर्फ मोहनिश मिलिंद बोरकर (वय 26, रमानगर कामठी) तसेच सराईत गुन्हेगार शेख अनवर ऊर्फ हकला शेख अमीन (वय 32, बाबा अब्दुल्लाहशह दर्गा कामठी) यांचा समावेश आहे.
आरोपींना नागपूर येथील सेशन कोर्टात हजर केले असता न्यायाधीश पठारे यांनी दोन आरोपींची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. यातील एका अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात हलविण्यात आले. अत्याचार प्रकरातील गुन्ह्यात आरोपींची ओळख परेड होणे, हा या गुन्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ही "परेड' न्यायालयीन कोठडीतच करावी लागत असल्याने त्याला प्रथम प्राधान्य देत या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

आणखी वाचा  :  तुकाराम मुंढे इफेक्‍ट, दहाच्या ठोक्‍याला कार्यालयात पोहचायला लागले मनपा कर्मचारी

आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उमरेड (जि.नागपूर) : तालुक्‍यातील वेलसाखरा गावातील एका 14 वर्षीय मुलीवर भिवापूर तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या मांडवा गावातील 22 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.22) उघडकीस आली. घटनेतील फिर्यादी कुमारिका ही 14 वर्षांची असून आरोपी राधेश्‍याम जाधव याने मोबाईलवर तिच्याशी संपर्क करून घराबाहेर बोलावून दुचाकीवर बसविले. उमरेड तालुक्‍यातील हेवती शिवारातील कारखान्यामागे नेऊन कुकर्म केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. कुणाला माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याच्या पीडितेच्या तोंडी तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीस उमरेड पोलिसांनी अटक केल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wait! "It 's dangerous to go out in the dark