परतीच्या पावसामुळे दाणादाण, लवकरच घेणार विदर्भातून निरोप

waterlogging in Nagpur city due to return rain
waterlogging in Nagpur city due to return rain

नागपूर  : शनिवारच्या जोरदार दणक्यानंतर पावसाने सोमवारी पुन्हा दमदार हजेरी लावली. विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह दीड तास बरसलेल्या धुंवाधार पावसाने नागपूरकरांची चांगलीच दाणादण उडाली. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील चोवीस तासांत विदर्भात आणखी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.

सोमवारी दुपारी तीनपर्यंत ऊन तापल्यानंतर अचानक आभाळ भरून आले. पाहतापाहता टपोऱ्या थेंबाचा पाऊस सुरू झाला. अर्धा तास कुठे हलका व कुठे जोरदार बरसल्यानंतर वरूणराजाने अचानक गिअर बदलविला. त्यानंतर जवळपास तासभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. जोरदार पावसासोबतच विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनाही झाल्या. सुदैवाने कुठेही वीज किंवा झाडे पडली नाहीत. 

पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचले होते. नागपूरकरांना आडोसा शोधावा लागला. अनेक चौकांमध्ये तसेच सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी तुंबले होते. त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. काही काळ वाहतुकीलाही ब्रेक लागला होता. काळ्याकुट्ट आभाळामुळे शहरात अंधार पडला होता. त्यामुळे वाहनधारकांना हेडलाईट लावून वाहने चालवावी लागली. पावणेचारला सुरू झालेला पाऊस सव्वा पाचला थांबल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला व चकचाकरमान्यांना सुखरूप घरी जाता आले. 

पावसामुळे तापमानात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासूनही नागपूरकरांना दिलासा मिळाला. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ११.४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. बंगाल व आंध्र प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात सध्या पावसाळी वातावरण आहे. हवामान विभागाने मंगळवारीही जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. 

लवकरच विदर्भातून निरोप

दरम्यान, राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, लवकरच विदर्भातूनही तो निरोप घेण्याची शक्यता आहे. मात्र जाताजाता जोरदार दणका देण्याची दाट शक्यता आहे. शनिवार व सोमवारचा पाऊस काही पिकांसाठी फायदेशीर असला तरी, मोठे नुकसानही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com