दर तीन वर्षांनी का येतो अधिक महिना? या महिन्यात जावयाला का देतात वाण?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

जेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो."अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात.

नागपूर : मराठी महिने चंद्रावर आधारित असतात. या चांद्रमासाला सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी आणि कालगणना एकसारखी होण्यासाठी पंचांगकर्त्यांनी अधिक महिन्याची योजना केली, असं जाणकार सांगतात.
साधारण दर पावणेतीन वर्षांनी अधिक मास येतो. ग्रेगोरियन कालगणना म्हणजे इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर ३६५ दिवसात एक वर्ष पूर्ण होतं. पण चांद्रमासाचा विचार केला तर ३५४ तिथींचं एक वर्ष असतं. हा ११ दिवसांचा अनुशेष तिसऱ्या वर्षात अधिक महिन्याच्या निमित्ताने भरून निघतो.

जेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो."अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात.

धोंड्याचा महिना आणि जावयाचा संबंध
अधिक महिन्यात दानधर्म करावा, असं शास्त्रात सांगतात. पण यथाशक्ती दान असावं आणि ते गुप्त असावं याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. "हिंदू संस्कृतीत गुप्त दानाला महत्त्व आहे. प्रतिष्ठेसाठी परंपरेच्या नावावर केलेलं दान शास्त्रात उल्लेखलेलं नाही. अनारशाचं वाण आणि दीपदान एवढंच अपेक्षित असतं. जावयाला विष्णूचं स्वरूप मानून हे दान खरं तर विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे."अधिक महिन्यात पुरणाचे धोंडे अनेक घरांमध्ये करतात.

महागड्या वस्तू, सोनं-नाणं जावई किंवा सासरच्या मंडळींना देण्याच्या प्रथेचे प्रस्थ अलिकडे वाढले आहे आणि ते अनिष्ट आहे, त्याऐवजी "आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान , अर्थदान, ग्रंथदान गरजू लोकांना करणे जास्त योग्य आहे,"
या महिन्यात जावायाला धोंड्याचं जेवण आणि वाण म्हणून काही वस्तू किंवा दागिना द्यायची पद्धत आहे.

अलिकडे मात्र त्याला सेलिब्रेशनचे स्वरुप आले आहे. आर्थिक परिस्थिती बदलली तसे वाणाचे संदर्भ बदलले. मार्केटिंगमुळे याचं लोण पसरतं आहे. धोंड्याच्या महिन्याचं वाण अकारण प्रतिष्ठेचं व्हायला लागलं ते त्याच्या जाहिराबाजीमुळे. असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.

अधिक महिन्यात छोट्या मोठ्या दागिन्यांच्या दुकानात झळकणाऱ्या जाहिराती पाहिल्या किंवा सोशल मीडियावरच्या पोस्ट वाचल्या तर याचे वाढते प्रस्थ लक्षात येईल.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is Adhik month?