देवा रे देवा! काय झाले मोसंबीच्या बागांना, रात्रभरात फळे गेली कुठे? वाचा...

मनोज खुटाटे
Thursday, 3 September 2020

यंदा संत्रा, मोसंबीच्या बागा चांगल्या आल्या होत्या. झाडांना दृष्ट लागावी अशी फळधारणा झाली होती. बऱ्याच परिश्रमानंतर चांगले पीक येणार म्हणून पंचक्रोशीतील  शेतकरी मनोमन खूष होते. एके दिवशी भल्या पहाटे उठून जामगाव येथील एक शेतकरी  शेतात मोसंबी बगिच्यातील पाखरे हाकलायला शेतात गेले. शेतात पाय ठेवताच पुढे दिसलेल्या दृश्याने ते पुरते हादरले. त्यांचा त्याच्याच  डोळ्यांवर विश्‍वास बसेना ! झाडे होती, झाडावरील रसदार फळे मात्र गायब, काय झालेऽऽ...

जलालखेडा (जि.नागपूर) :  संपूर्ण देशामध्ये नागपूर जिल्हा संत्रा, मोसंबी या पिकासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात नरखेड तालुक्यामध्ये संत्रा मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न घेतले जाते. नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकरी या पिकावर अवलंबून आहेत. संत्रा, मोसंबीचे पीक या भागातील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोसंबीचे बगीचे आले आहे. यावर्षी मोसंबीला आधीच भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. त्याच कोरोनासारख्या अज्ञात रोगाने आक्रमण केले. चार दिवसातच होत्याचे नव्हते झाले. मोसंबीची फळे खाली आली व बागा फळविरहित झाल्या.

अधिक वाचाः‘सालई, माहुली’ला जलसमाधी, नयाकुंड मात्र जुना असूनही साबूत, काय भानगड आहे, वाचा…

पाखरे हाकायला गेले आणि ‘ते’अवाक झाले...
नरखेड तालुक्यात मृग बहार बहरालाच नाही, अशात शेतकऱ्यांच्या आशा आंबिया बहरावर अवलंबून होत्या. पण तालुक्यातील जलालखेडा, भारसिंगी, जामगाव, मायवाडी, रानवाडी यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात मोसंबीचे आंबिया बहराचे पीक आले. परंतू या भागातील आलेले मोसंबी गळाली असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  शेकडो टन मोसंबी गळल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेलं आहे. या भागातील शेतकऱ्यांकडे ५ ते १० एकरमध्ये मोसंबीच्या बागा आहे. त्यामुळे दरवर्षी ते लाखो रुपयांमध्ये मोसंबीचे बगीचे विकत असतात. परंतू अचानक आलेल्या रोगामुळे मोसंबीचे पूर्ण पीक खाली गळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असा कोणता रोग असेल की ज्यामुळे शेकडो टन  मोसंबी रात्रभरात गळून खाली पडली.  शेतकरी सकाळी उठून शेतात मोसंबी बगिच्यातील पाखरे  हाकलायला शेतात गेला असता, त्याला झाडावरील सर्व मोसंबी खाली पडलेल्या दिसल्या. हे पाहून  शेतकऱ्यांना पूर्णपणे नैराश्य आले. कोरोनामुळे संत्रा, मोसंबी या पिकाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आर्थिक फायदा होणार होता. परंतू तोही हिरावून घेतला. हाती आलेले मोसंबीचे पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत कृषी विभागाला सांगण्यात आले आहे. कृषी विभाग या भागातील बगिच्यांची पाहणी करून आर्थिक मदतीसाठी अहवाल शासनाकडे पाठवणार आहे.

अधिक वाचाःआधीच आर्थिक अडचण असताना सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच

 

शेतकरी आत्महत्या करणार नाहीत तर काय?
या वर्षी मोसंबीचा बगीचा मोठ्या प्रमाणात आला होता. दरवर्षी  मोसंबी विकून चांगले पैसे येतात. यावर्षी कोरोनामुळे  मोसंबीला मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी भाव १५ ते १८ हजार रुपये टन आहे. तरी माल खूप असल्याने चांगले पैसे होण्याची अपेक्षा होती. सहा लाखात मागणीही झाली होती. पण जास्त पैसे येतील म्हणून बगीचा विकला नाही. पण दोन चार दिवसातच ३० टन मोसंबी खाली आली व आता एका रुपयाही होत नाही. शासनाने वेळीच मदत केली नाही तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत तर काय?
चंद्रशेखर पावडे
शेतकरी जामगाव खुर्द

रोगांविषयी मार्गदर्शन करावे
शेतकऱ्यांना शासनाकडून अधिकृत विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. ज्या शेतकऱ्याने फळबागेसाठी  बॅंकेतून  कर्ज घेतले आहे, त्यांनासुद्दा नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करावे. कृषी विभाग पाहणी करीत असून नुकसानीबाबत जो अहवाल देईल, तो विमा कंपनी ने ग्राह्य धरावा. शासनाकडून बागायतदार शेतकऱ्याना एन.आर.पी. संस्थेमार्फत या रोगांविषयी मार्गदर्शन करावे.
वसंत चांडक
माजी सभापती, पंचायत समिती नरखेड.

अन्यथा मोठे जनआंदोलन करू !
हजारो टन मोसंबीची गळ झाली. निर्लज्य शासन दखल घेण्यास तयार नाही. शेतकऱ्यांनी जगायचे की मरायचे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनानी तात्काळ दखल घेवून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मोठे जनआंदोलन करू.
संदीप सरोदे
माजी सभापती, काटोल तथा  जिल्हाध्यक्ष भाजप किसान मोर्चा

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened to the citrus orchards, where did the fruits go overnight?