
यंदा प्रथमच पदवीधर निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे. तसेच चुरसही बघायला मिळाली. प्रत्येक उमेदवाराने आपल्या समर्थकांना मतदारांना बाहेर काढल्याने टक्केवारी प्रचंड वाढली आहे.
नागपूर ः नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीचा निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असून भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी आणि काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांचा फैसला होणार आहे. नागपूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक सुमारे एक लाख मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे निकाल नागपूरकर मतदारांवरच अवलंबून राहणार आहे.
यंदा प्रथमच पदवीधर निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे. तसेच चुरसही बघायला मिळाली. प्रत्येक उमेदवाराने आपल्या समर्थकांना मतदारांना बाहेर काढल्याने टक्केवारी प्रचंड वाढली आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातून काँग्रेसला मोठी आशा वाटत आहे तर गडचिरोलीमध्ये भाजप आघाडीवर राहील असे जोशी यांचे समर्थक दावा करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसला बरोबर मतदान होईल असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र जोशी आणि वंजारी यांच्यासह एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी रिपाइं मतांवर दावा करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यांनी आपली कामगिरी जोख बजावली तर भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदा प्रथमच काँग्रेसचे नेते प्रचारात होते. मेळावे घेतले. अनेक बूथवर पदाधिकारी बसलेले दिसले. महाआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही नेते व कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र दिसले. महाआघाडीसाठी हे शुभसंकेत असले तरी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत किती नेते पोहचले हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसरीकडे संदीप जोशी यांच्यासाठी भाजपने आपली यंत्रणा ताकदीने राबवली.
माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस शेवटचे दोन दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. अनेक नेत्यांच्या भेटीगाठी तसेच गुप्त बैठकाही त्यांनी घेतल्या. काँग्रेसच्या काही नेत्यांच्याही घरी त्यांनी आकस्मिक भेटी दिल्याचे कळते. त्यामुळे काँग्रेसला धडकी भरली आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे हेसुद्धा आशावादी आहेत. मात्र त्यांच्याकडे असलेली यंत्रणा आणि रसद फार तोकडी होती. केवळ अनुशेष आणि विदर्भावरील अन्यायाला किती पदवीधर मतदान करतात हे उद्याच कळणार आहे.
संपादन - अथर्व महांकाळ