का वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा?प्रशासनाचा गाफिलपणा की नागरिकांची बेफिकिरी

corona
corona

नागपूर : महापालिकेने सतरंजीपुरा, मोमिनपुरा भागावर लक्ष केंद्रित करून कोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, या भागांकडे लक्ष देतानाच महापालिकेचे इतर भागांकडे दुर्लक्ष झाल्याचे पार्वतीनगरातील कोरोनाबाधितावरून स्पष्ट झाले. त्यातच इतर भागांतील नागरिक जणू लॉकडाउन उघडल्याप्रमाणे रस्त्यावर, दुकानात दररोज गर्दी करीत आहेत. नागरिकांच्या या बेफिकिरीने शहरावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांत 87 कोरोनाबाधित पुढे आल्याने शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे चित्र आहे. नागपुरात पहिला कोरोनाचा रुग्ण मेयोमध्ये 11 मार्चला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने प्रत्येक घराचे सर्वेक्षण आदी सुरू केले. मात्र, यात नागरिकांनीही हवे तसे सहकार्य केले नाही. मागील महिन्यात सतरंजीपुरा येथील एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सतरंजीपुरा येथील वृद्धाच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात पाठविले. विशेष म्हणजे या भागातून दररोज नागरिकांना विलगीकरणासाठी पाठविण्यावर भर देण्यात आला. शहरात कोरोनाची साखळी पसरू नये, यासाठी पालिकेने या भागावर लक्ष केंद्रीत केले. हा पूर्ण परिसर सिल करण्यात आला. त्यानंतर मोमीनपुरा भागावरही महापालिकेने लक्ष केंद्रीत केले. येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर या दोन्ही भागासह शांतीनगर, मस्कासाथ या भागातून नागरिकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले. सतरंजीपुऱ्यातील 1700 नागरिक विलगीकरणात पाठविण्यात आले. परंतु त्याचवेळी शहराच्या इतर भागात पालिकेने केवळ औषध फवारणीवरच समाधान मानले. औषध फवारणी करतानाही अनेक नगरसेवक फवारणी करणाऱ्यांना आपल्या भागात पळवून नेत असल्याने अनेक भाग फवारणीपासूनही वंचित राहीले. प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच सतरंजीपुरा, मोमीनपुरा आदी भाग वगळला तर नागरिकांनीही जणू लॉकडाऊन संपुष्टात आले, अशा थाटात वावरणे सुरू केले. मानेवाडा रोड, वर्धा रोड, म्हाळगीनगर, इंदोरा आदी भागातील रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. भाजी बाजारांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित नागरिक खरेदीसाठी दुकानांवर उड्या मारत आहेत. जीवनावश्‍यक वस्तुंच्या दुकानांतही नागरिकांनी सुरुवातीला मोठी गर्दी केली. एवढेच नव्हे तर मॉर्निंग वॉकला बिनधास्त रस्त्यावर निघत आहे. अनेकजण घरातील पाळीव कुत्रे घेऊन रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना खोटे बोलून दुचाकीधारक फिरायला बाहेर निघत आहे. नागरिकांचा हा बिनधास्तपणाही शहराला आणखी संकटात टाकणारा ठरला आहे.
12 दिवसांत शंभरावर कोरोनाबाधित
शहराने 24 एप्रिलला कोरोनाबाधितांची शंभर गाठली. त्यानंतर बुधवारी, 6 मेला कोरोनाबाधिताचे द्विशतक पूर्ण झाले. एकूण 12 दिवसांत शंभर कोरोनाबाधितांची भर पडली. आज या कोरोनाबाधितांच्या संख्येने अडीचशेचा पल्ला गाठला. अर्थात मागील 13 दिवसांत दीडशेवर रुग्णांची वाढ झाली.

सविस्तर वाचा - वैद्यकीय प्रमाणपत्र या झोनमध्ये मिळणार
कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
शहरात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधिताच्या संख्येमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. सतरंजीपुरा, मोमीनपुरा येथून नागरिकांना विलगीकरणासाठी नेताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे इतरांनाही लागण होत आहे.
वीरेंद्र कुकरेजा, सभापती, आरोग्य समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com