धक्कादायक... राज्यात वन्यजीवाच्या हल्ल्यात पाच महिन्यांत 30 जणांचा मृत्यू

राजेश रामपूरकर
मंगळवार, 2 जून 2020

राज्यातील वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या, विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी सात महिन्यांत फक्त 16 जणांचे मृत्यू गेले होते.

नागपूर : टाळेबंदीमुळे गावातील नागरिकांचा जंगलातील वावर वाढल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली. परिणामी, राज्यात गेल्या पाच महिन्यांत मानव-वन्यप्राण्यांच्या संषर्घात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 30 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 20 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

राज्यातील वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या, विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी सात महिन्यांत फक्त 16 जणांचे मृत्यू गेले होते. त्यातुलनेत हा आकडा दुप्पट आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावामध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच बफर आणि गावामध्ये सुरू झाला आहे.

वाघ, बिबट्यासह अस्वल, रानडुकरांचे वास्तव्य असलेल्या भागात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे घटनावरून लक्षात येत आहे. जंगलात जाण्यास गावकऱ्यांना मजाव केल्यानंतरही चराई व जळतणासाठी जंगलात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सरपण उचलण्यात गुंतलेल्या गावकन्या अचानक हल्ला करतात.

 

वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक 20 बळी

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसह इतरही परिसरातही वाघाची संख्या वाढली आहे. त्या तुलनेच जंगलाचे क्षेत्र कमी पडत असल्याने या जिल्ह्यातील वाघ इतरत्र संचार करीत आहेत. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची लढाईही होऊ लागली आहे. मानव-वन्यप्राण्याचा संघर्षही वाढला आहे. वाघ शिकार, पाण्याच्या शोधात जंगलाशेजारील गावात प्रवेश करतात. वन विभागाकडील आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 12, गडचिरोलीत तीन, भंडारा, गोंदियामध्ये प्रत्येकी दोन तर नागपूर जिल्ह्यात एका जणांचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणाचे जीव गेले आहेत. नाशिक दोन, वर्धा, चंद्रपूर, अहमदनगर येथे प्रत्येकी एक कोल्हापूर जिल्ह्यात गव्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाला जीव गमवावा लागला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 14 जणांना जीव गमवाला लागला.

ते' दोघे पती-पत्नी दुचाकीवर जात होते घराकडे, रस्त्यातच कशा तुटल्या जन्माच्या गाठी...

चंद्रपूर जिल्हा आघाडीवर

चंद्रपूर जिल्ह्यात जंगल क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा वाघांच्या संख्या अधिक झालेली आहेत. वाघांची वाढलेली संख्या लक्षात घेता तज्ज्ञाच्या अहवालानुसार वन विभागाने येथील वाघांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेतला असला तरी काही स्वयंसेवी संस्थेसह वन्यजीवप्रेमी त्याला विरोध करीत आहे. व्याघ्र अभ्यासकसुद्धा हा निर्णय चुकीचा असल्याचे असल्याचे म्हणत आहे. वाढत्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांकडूनही वाघांना स्थलांतरित करा अशी मागणी होत आहे. तरी स्थलांतरण हा पर्याय नसल्याचे स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 15 लाखांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळेही घटनेत वाढ झाल्याचे काही अधिकारी, वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक दबक्‍या आवाजात बोलू लागले आहे. यापुढे जंगलात जाणाऱ्या व्यक्तीचे वय काय हाही निकष लक्षात घेण्यात यावा. तसेच पोलिस पाटील, सरपंच आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीवरही त्याची जबाबदारी निश्‍चित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

कारणमीमांसा करण्यात येईल
मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाढला आहे. वाघांनी हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना बिबट आणि अस्वलांच्या हल्ल्यातही मानवाचा जीव गेला आहे. याची कारणमीमांसा करण्यात येईल.
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

 

टाळेबंदीमुळे घटना वाढल्या
टाळेबंदीमुळे सर्वत्र शांतता असल्याने वन्यप्राणी गावांच्या शेजारी मुक्त संचार करीत होते. वन विभागाने टाळेबंदी असल्याने लोक जंगलात जाणार नाही असे गृहीत धरल्याने त्यांची गावाशेजारी गस्त करण्याऐवजी जंगलातील गस्तीकडे लक्ष दिले. त्यामुळेच घटना वाढल्या आहेत.
किशोर रिठे, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

 

वर्ष - मनुष्यांचा मृत्यू
2016 - 53
2017 - 50
2018 - 36
2019 - 32
मे 2020 पर्यंत - 30

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wildlife attacks in the state have killed 30 people in five months