मुख्यमंत्री देतील का `प्रश्नचिन्ह`ला उत्तर? 

प्रमोद काळबांडे
Saturday, 5 December 2020

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आश्रमशाळा कशीबशी सुरू होती. परंतु समृद्धी महामार्गामुळे या शाळेला जबर फटका बसला. लोकांच्या मदतीतून बांधलेच्या शाळेच्या इमारतीवर बुलडोजर चालला. यात विहीर, वाचनालयही उद्धवस्थ झाले.

नागपूर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी मतीन भोसले यांच्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेला भेट देणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे तुकडे झालेल्या फासेपारधी समाजाच्या या आश्रमशाळेचे भोग मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे संपतील, अशी आशा निर्माण झाली आहे. 

गेली नऊ वर्षे मतीन भोसले यांनी अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी बालकांची आश्रमशाळा लोकांच्या मदतीच्या बळावर चालविली. त्यासाठी त्याने प्रसंगी भीक मॉंगो आंदोलनही केले. भीक मागणारी, चोरी करणारी, गुन्हेगारीत लिप्त झालेली बालके विविध ठिकाणांहून गोळा करून मतीन भोसले यांनी शाळा सुरू केली. त्याच्या शाळेत सद्दस्थितीत 500 हून जास्त बालके दाखल आहेत.

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आश्रमशाळा कशीबशी सुरू होती. परंतु समृद्धी महामार्गामुळे या शाळेला जबर फटका बसला. लोकांच्या मदतीतून बांधलेच्या शाळेच्या इमारतीवर बुलडोजर चालला. यात विहीर, वाचनालयही उद्धवस्थ झाले. त्या बदल्यात मतीन भोसले यांना विविध कामाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, बरीच आश्वासने पाळली गेली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे या आश्वासनांची पूर्तता होण्याची दाट शक्यता आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जागर; आझाद मैदानात ठिय्या

फासेपारधी समाज पोट भरण्यासाठी शिकार करणे, चोरी करणे, दारू काढणे अशी कामे करायचा. मतीनच्या समाजिक कार्यामुळे अनेकांनी हे व्यवसाय सोडण्याचा प्रयत्न केला. फासेपारधी बालके याच दिशेने जावू नयेत यासाठी आश्रमशाळा उभारली. फासेपारधी बालकांना जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे राज्यातील पहिलेच मॉडेल होय. फासेपारधी समाजाची असंख्य बालके आजही कलंकित कामात गुंतली आहेत. प्रश्नचिन्हसारख्या अशा अनेक शाळा राज्यात उभारण्याची गरच आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीतून हे साध्य झाले तर फासेपारधी समाजाच्या पुढच्या पिढ्यांचा वनवास संपण्यासाठी मदतच होईल.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Chief Minister answer the Prashnachinha school?