स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जागर; आझाद मैदानात ठिय्या; दिल्लीतील कास्तकरांच्या लढ्याला पाठिंबा

चेतन देशमुख 
Friday, 4 December 2020

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व केंद्र शासनाने आणलेले कृषीविधेयक तत्काळ मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातही रण पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे.

यवतमाळ : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी व पणन कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध संस्था व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. शेतकरीविरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी आठ ते शुक्रवारी (ता.चार) सकाळी सहापर्यंत आत्मक्‍लेश जागर आंदोलन केले.

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व केंद्र शासनाने आणलेले कृषीविधेयक तत्काळ मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातही रण पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. यासोबत कृषिपंपांसाठी शेती सिंचनास दिवसाला 12 तास विनाखंडित वीजपुरवठा, चालू खरीप हंगामामध्ये सन 2020-2021च्या सोयाबीन बोगस बियाण्यांमध्ये जिल्ह्यातील 12 हजार तक्रारकर्त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.

सविस्तर वाचा - कडाक्याच्या थंडीत वाढली हुरड्याची रंगत; चुलीवरच्या जेवणासाठी गावाकडे धूम

ओला दुष्काळ घोषित केलेल्या आर्थिक मदतीमध्ये जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, खरीप हंगामात लागवड झालेल्या नऊ लाख हेक्‍टरवरील सर्व पिकांना सरसकट पंतप्रधान पीकविम्यामध्ये समाविष्ट करून आर्थिक जोखीम परतावा देण्यात यावा, पणन व सीसीआयचे केंद्र सोळाही तालुक्‍यांत सुरू करण्यात यावे, या मागणांच्या समावेश आहे.

 शेतकऱ्यांनी स्थानिक आझाद मैदानात जागरण करून आत्मक्‍लेश आंदोलन केले. या ठिकाणी शेतकऱ्यांनी भजन व कीर्तन करून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनात शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, मनीष जाधव, अनुप चव्हाण, सिकंदर शहा, शिवानंद राठोड, मंगल राठोड, श्रीराम चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

 जाणून घ्या - नागपुर पदवीधर निवडणूक: पराभव नक्की कोणाचा? भाजपचा की संदीप जोशींचा?

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

-शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत.
-दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी केंद्र शासनाने चर्चा करावी.
-हमीभाव कायद्याची कडक अंमलबजावणी.
-दिवसा कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा.
-जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest by swabhimani farmers community in yavatmal