
गडकरी यांनी आज ऑनलाइन उत्तर प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे १६ योजनांचे लोकार्पण, कोनशिला अनावरण व एका कामाचा शुभारंभ केला
नागपूर ः आगामी तीन वर्षांत दोन लाख कोटींचे महामार्ग तयार केले जाणार असून यामुळे देशाच्या विकासाचे चित्रच बदलणार असल्याचा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
गडकरी यांनी आज ऑनलाइन उत्तर प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे १६ योजनांचे लोकार्पण, कोनशिला अनावरण व एका कामाचा शुभारंभ केला. या योजनांवर ७ हजार ४७७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ५०५ किमीचे महामार्ग तयार होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग व अन्य उपस्थित होते.
सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी
गेल्या ६ वर्षाच्या काळात उत्तरप्रदेशात महामार्गांच्या लांबीमध्ये ४० टक्के वाढ झाली असून ७६४३ किमीवरून आज ११ हजार ३८९ किमी महामार्गांची लांबी झाली आहे. महामार्गांसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनासाठी तीन वर्षात २६ हजार कोटी देण्यात आले असून २०२०-२१ मध्ये ६५ हजार कोटींचे २९०० किमीचे महामार्ग पूर्ण करण्यात येणार आहेत. यात ४२ महामार्गांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात ६८० किमीचे ७२५० कोटींच्या कामांमध्ये पाच आरओबी आणि एका उड्डाणपुलाचा समावेश आहे.
गडकरी म्हणाले, गंगेवर जलमार्ग विकसित झाले तर उत्तरप्रदेशला त्याचा मोठा फायदा होईल. एमपीबीएस सी-प्लेनचा विचार उत्तरप्रदेशने करावा. प्रयागराज ते वाराणसी गंगेच्या किनाऱ्यावर जी शहरे आहेत, तेथे सी-प्लेन सेवा सुरू करता आली तर पर्यटनाच्या दृष्टीने उत्तरप्रदेशला अधिक महत्त्व प्राप्त होईल व रोजगार निर्मिती होईल.
क्लिक करा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
बौद्ध सर्किटसाठी साडे चार हजार कोटींचे महामार्ग बनवून बौद्ध सर्किट जोडले जाणार आहे. महामार्गाची कामे करताना कामाचा दर्जा आणि वेळेत काम पूर्ण करणे यात कोणताही समझोता आम्ही करीत नाही, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
संपादन - अथर्व महांकाळ