हिवाळी अधिवेशन मुंबईत? तयारीवर विधिमंडळ सचिवालय असमाधानी; मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राजेश चरपे
Saturday, 7 November 2020

अधिवेशन महिनाभरावर आहे. विधिमंडळ सचिवालयाने घेतलेल्या आढाव्यात बांधकाम विभाग व प्रशासनाकडून कामाची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाकडून कोरोनाबाबतची माहिती व उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. यावर सचिवालयाने असमाधान व्यक्त केल्याची चर्चा आहे.

नागपूर : कोरोनाचा वाढता धोका, अधिकाऱ्यांचा विरोध लक्षात घेता हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अधिवेशनासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाने आढावा घेतला. प्रशासनाच्या तयारीवर त्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. तसा अहवाल विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीला सादर करण्यात येणार असल्याचे कळते. हा अहवाल अधिवेशन नागपूरला न घेता मुंबईत घेण्यासाठी मोठा आधार मानला जाणार आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रालय नागपूरला स्थानांतरित करावे लागते. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याने मुंबईसह नागपूरच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. काही लोकप्रतिनिधींनी याला विरोध दर्शविला आहे. अधिवेशन नागपूरला होणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आल्याने ते रद्द करणे अवघड ठरत होते.

सविस्तर वाचा - विश्वास बसेल का! एका उंदीरमुळे वृद्धेचे कुटुंब आलं उघड्यावर

परंतु, मुंबई पातळीवर अधिवेशन नागपूरला न घेण्याबाबत आधीच जवळपास निश्चित करण्यात आले होते. त्यामुळेच यंदा बांधकाम विभागाकडून कामाला सुरुवात करण्यात आली नाही. कामाच्या निविदा काढण्यात आल्या, परंतु कार्यादेश देण्यात आले नाही.

अधिवेशन महिनाभरावर आहे. विधिमंडळ सचिवालयाने घेतलेल्या आढाव्यात बांधकाम विभाग व प्रशासनाकडून कामाची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाकडून कोरोनाबाबतची माहिती व उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. यावर सचिवालयाने असमाधान व्यक्त केल्याची चर्चा आहे. विधिमंडळ सचिवालय याबाबतची माहिती मंत्रिमंडळ आणि कामकाज सल्लागार समितीला देतील. त्याआधारेच अधिवेशनाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते.

आधीच ठरले

एका कॅबिनेट मंत्र्याने हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. केवळ तांत्रिक कारणांची पूर्तता बाकी असल्याने जाहीर केले जात नाही. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

जाणून घ्या - नियम शिथिल नागरिक बिनधास्त! वाहनांचा वेग वाढला; अनेकांना गमवावा लागतोय जीव

सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय
अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- राजेंद्र भागवत,
सचिव, विधिमंडळ

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter Convention in Mumbai