महिला धडकल्या बॅंकेवर, असे काय घडले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शेतकऱ्यांना गेल्या वीस दिवसांपासून पीककर्ज मिळत नसल्याने शेतकरी रमेश मेश्राम यांनी जि. प. सदस्य कविता साखरवाडे यांच्याकडे धाव घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता कविता साखरवाडे बॅंकेत धडकल्या व शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता काय अडचण आहे, याची पुरेपूर माहिती घेऊन बॅंक प्रबंधक गौरव कुमार यांच्याशी बोलल्या.

पचखेडी (जि.नागपूर) : शेतीची मशागत व पेरणी करण्याकरिता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता बॅंकांना आदेश देण्यात आले. मात्र, काही बॅंकांचे व्यवस्थापक स्वतःची मनमानी करीत शेतकऱ्यांना बॅंकांच्या चकरा मारण्याकरिता बाध्य करीत आहेत. असाच एक प्रकार पचखेडी येथील अलाहाबाद बॅंकेत सुरू असल्याने शेतकरी बॅंक व्यवस्थापनामुळे त्रस्त असल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा : कचरा रे कचरा, किती वाढला तुझा भाव, वजनासाठी केला जातो हा प्रकार...

शेतकरी मारतात वीस दिवसांपासून चकरा
केशोरी येथील रमेश मेश्राम यांनी गेल्या वीस दिवसांअगोदर अलाहाबाद बॅंक पचखेडी येथे पीककर्जाकरिता कागदपत्रे देऊ केली. वीस ते पंचवीस दिवसांपासून आज होईल उद्याला होईल, असे शब्द देत शेतकऱ्यांना बॅंकेच्या चकरा माराव्या लागतात. एकीकडे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करावी की पेरणी करावी, की बॅंकेच्या चकरा माराव्यात असाही सवाल सध्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.

हेही वाचा :  लॉकडाउनच्या काळात सॅनिटायझरची लागली लत,परंतु आता भोगावे लागतील गंभीर परिणाम...

कर्ज न देण्यात अडचण काय?
शेतकऱ्यांना गेल्या वीस दिवसांपासून पीककर्ज मिळत नसल्याने शेतकरी रमेश मेश्राम यांनी जि. प. सदस्य कविता साखरवाडे यांच्याकडे धाव घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता कविता साखरवाडे बॅंकेत धडकल्या व शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता काय अडचण आहे, याची पुरेपूर माहिती घेऊन बॅंक प्रबंधक गौरव कुमार यांच्याशी बोलल्या. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज द्यावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका जि. प. सदस्य कविता साखरवाडे यांनी मांडली.

आम्ही रस्त्यावर उतरू
बघण्याची भूमिका न घेता ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसेल त्या शेतकऱ्यांकरिता आम्ही रस्त्यावर उतरू व पीककर्ज देण्याकरिता बॅंक व्यवस्थापनाला भाग पाडू.
कविता साखरवाडे
जि .प. सदस्य वेलतूर, सर्कल

पिळवणूक थांबविण्याची गरज
माझ्या वडिलांच्या नावे 2012 चे पीककर्ज होते. ते आजतागायत माफ झाले नाही. यासाठी मी वारंवार बॅंकेच्या चकरा मारून पाठपुरावा केला. बॅंक मॅनेजर गौरवकुमार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
भेटण्याचा सल्ला देतात. त्यामुळे अशा बेजबाबदार बॅंक मॅनेजरवर कार्यवाही करून परिसरात होत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी मताचा जोगवा मागणाऱ्या नेत्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गुणवंता लांजेवार
शेतकरी

वेळ गेल्यावर कर्ज देणार काय?
पीककर्ज हे पीक लागवाडीसाठी देण्यात येते. आज घडीला पीक उगवले आहे, तर पीककर्जाची योजना कशासाठी पीक कापून झाल्यावर कर्ज देणार का?
-ज्ञानेश्वर टांगले
युवा शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women hit the bank, what happened ...