तब्बल ३ किलो सोने आणि ३० किलो चांदी घेऊन पसार; पारेख ज्वेलर्सच्या मालकाला कर्मचाऱ्यांनीच घातला गंडा 

अनिल कांबळे 
Sunday, 8 November 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतराव पारेख यांचे लकडगंज हद्दीत दारोडकर चौकात गायत्री अपार्टमेंट येथे पारेक ज्वेलर्स ब्रदर्स नावाने सराफा दुकान आहे.

नागपूर ः शहरातील नामांकित सराफा व्यापारी पारेख ज्वेलर्स यांची तीन कर्मचाऱ्यांनी साडेनऊ कोटींनी फसवणूक केली. कर्मचाऱ्यांनी मालकाची ३ किलो सोन्याचे दागिने आणि ३० किलो चांदी, शेअर्स आणि बॅंकेतील रोख रक्कम परस्पर काढली. या प्रकरणी सराफाच्या तक्रारीवरून आरोपी रामकुंवर जांगीड, सुनील जांगीड आणि मोहनलाल जांगीड अशी आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतराव पारेख यांचे लकडगंज हद्दीत दारोडकर चौकात गायत्री अपार्टमेंट येथे पारेक ज्वेलर्स ब्रदर्स नावाने सराफा दुकान आहे. त्या दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी रामकुंवर जांगीड आणि सुनील जांगीड कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. दोघेही विश्‍वासू असल्यामुळे त्यांच्या हातात दुकानाचा कारभार होता. काही महिन्यांपूर्वी अनंतराव पारेख यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. 

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

सराफा दुकानाची जबाबदारी अनंतराव यांचे नातू हार्दिक भरत पारेख (३२, शिवाजीनगर) यांच्याकडे आली. त्यांनी दुकानाचा लेखाजोखा तपासला असता त्यांना बिल आणि व्यवहारात तफावत आढळून आली. त्यामुळे त्यांनी रामकुंवर आणि सुनील यांना विचारणा केली. दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. त्यामुळे हार्दिक यांना संशय आला. 

त्यांना आजोबा अनंतराव पारेख यांच्या कार्यकाळातील व्यवहाराच्या फाईल्स काढल्या तसेच सुनील आणि रामकुंवर या दोघांनी केलेल्या व्यवहाराचा लेखाजोखा तपासला. त्यांना सुनील आणि रामकुंवर यांनी लाखोंतच नव्हे तर कोट्यवधीत घोळ केल्याचे लक्षात आले. आपल्या आजारी आजोबाचा अजानतेपणाचा फायदा घेऊन स्वतःच्या आणि संयुक्त खात्यातून ६ कोटी ८८ लाख रूपये परस्पर काढून फसवणूक केल्याचे लक्षात आले. 

सुनील जांगीड याने ९२ लाख ८५ हजार रूपयांचे शेअर्स सर्टीफिकेट डीपसरी स्लिपवर आजोबाच्या बनावट सह्या करून आपल्या नावे केल्याचे उघडकीस आले. ती रक्कम मोहनलाल जांगीडच्या बॅंक खात्यातर परस्पर वळती केल्याचे स्पष्ट झाले. तीनही आरोपींनी अनंतराव पारेख यांच्या डोळ्यात धूळ फेकून एक कोटी ५० लाख रूपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने, १२ लाख रूपये किंमतीचे ३० किलो चांदीचे दागिने हडपले. 

हेही वाचा - अपहरणानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार, फेसबुकवरून झाली होती ओळख 

एवढेच नव्हे तर अनंतराव पारेख यांचे बनावट मृत्यूपत्र तयार करून एकूण ९ कोटी ४२ लाख रूपये किंमतीची मालमत्ता आपल्या नावे करीत पारेख यांची फसवणूक केली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी हार्दिक पारेख यांच्या तक्रारीवरून तीनही जांगीड ब्रदर्स विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worker did fraud with parekh jewellers owner