कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला युवक; दुसऱ्या दिवशी शिवारात दिसला रक्ताने माखलेला दगड

अजय धर्मपुरीवार
Tuesday, 10 November 2020

मृतदेह एका झुडपाजवळ पडून होता. काही अंतरावर रक्त व रक्ताने माखलेला दगड पडून होता. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा कयास पोलिस लावत आहे. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविण्यात आला आहे.

हिंगणा (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेळा(हरिश्चंद्र) शिवारात एका २३ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला. ही घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास समोर आली. विनीत सुरेश बन्सोड (२३, रा. भीमनगर, अजनी नागपूर) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत हा मिहान परिसरात एका कन्स्ट्रक्शन साईटवर मजूर म्हणून काम करीत होता. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी तो कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर घरी परत आलाच नाही. त्याला दारूचे व्यसन होते. तो कधी-कधी घरून दोन दोन दिवस बेपत्ता असायचा. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा त्याची मिसिंग दाखल केली नव्हती.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

आज दुपारी वेळा हरिश्चंद्र या गावाच्या शिवारात त्याचा मृतदेह काही लोकांना दिसला. त्यांनी लागलीच याची सूचना पोलिसांना दिली. आधी बेलतरोडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. परंतु, हा परिसर हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने दुपारी दोन वाजता हिंगणा पोलिसांना सूचना देण्यात आली. ठाणेदार सारीन दुर्गे व पथक घटनास्थळी पोहोचले.

मृतदेह एका झुडपाजवळ पडून होता. काही अंतरावर रक्त व रक्ताने माखलेला दगड पडून होता. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली असावी, असा कयास पोलिस लावत आहे. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविण्यात आला आहे. डीसीपी नरुल हसन, एसीपी अशोक बागुलसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young boy murder in rural Nagpur