रात्र रात्रभर चालायचा पब्जीचा गेम अन्‌ सकाळी तो उठलाच नाही...

अनिल कांबळे
शुक्रवार, 10 जुलै 2020

शिक्षक असलेल्या वडिलांनी त्याला अनेकदा सततच्या खेळाबाबत टोकले. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. अनेकदा तर रात्र रात्रभर त्याचा पब्जीचा गेम चालायचा. वारंवार पब्जी खेळत असल्यामुळे त्याला मायग्रेनचा त्रासही सुरू झाला होता. यावर डॉक्‍टरांचे उपचारही सुरू होते.

नागपूर : नाव रितिक किशोर ढेंगे... वय 20 वर्षे... राहणार जुना फुटाळा... रितिकगचे वडील शिक्षक... आई गृहिणी... दोन भावंडं असलेला रितिक एकाकी स्वभावाचा... तो पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत होता... त्याचे शिक्षण शेवटच्या टप्प्यात होते... कोरोनाचा धोका असल्यामुळे पदवी सोडून तो नागपुरात आला... त्याला पब्जीचे फार वेड होते... अन्‌.... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिक किशोर ढेंगे (वय 20, जुना फुटाळा, अंबाझरी) हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे शिक्षण शेवटच्या टप्प्यात होते. कोरोनाचा धोका असल्यामुळे पदवी सोडून तो नागपुरात आला होता. मात्र, रितिक एकाकी स्वभावाचा असल्यामुळे अनेकदा भावंडांसह गप्पा करण्याऐवजी एकटा रूममध्ये पब्जी खेळात रमायचा.

महत्त्वाची बातमी - तुमचे उत्पन्न एक लाखावर आहे ना, मग पांढरे रेशनकार्ड मस्ट!

शिक्षक असलेल्या वडिलांनी त्याला अनेकदा सततच्या खेळाबाबत टोकले. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. अनेकदा तर रात्र रात्रभर त्याचा पब्जीचा गेम चालायचा. वारंवार पब्जी खेळत असल्यामुळे त्याला मायग्रेनचा त्रासही सुरू झाला होता. यावर डॉक्‍टरांचे उपचारही सुरू होते. 

पब्जी खेळताना अनेकदा हार-जीत होत असल्याने तो मनाने खचत होता. त्यामुळे तो आठ-आठ दिवस नैराश्‍यात वागत होता. आठ दिवसांपासून त्याच्या वागण्यात कुटुंबीयांना फरक जाणवत होता. बुधवारी दुपारी बारा वाजता सर्वांनी जेवण केले. रितिक मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये गेला. त्याने सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेतला.

हेही वाचा - 10 ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी संघटनेचा निर्णय

बराच वेळ झाला तरी रितिक बाहेर आला नाही, म्हणून त्याच्या आईने त्याला आवाज दिला. मात्र, रूममधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आईने दरवाजा लोटला. रितिक गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर आईने हंबरडा फोडला. सर्वांनी रूमकडे धाव घेतली. दोरी कापून रितिकला खाली उतरवले. त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

मोबाईल आणि तो बस्स...

रितिकला पब्जीचे भारी वेड होते. तासन्‌तास तो गेममध्ये रमून असायचा. सतत गेममध्ये गर्क राहत असल्याने त्याचा स्वभावही एकाकी झाला होता. मोबाईल आणि तो बस्स. कुटुंबीयांसोबत गप्पागोष्टी करण्याऐवजी त्याला मोबाईलच आवडायचा. पब्जीच्या खेळात अंतिम टप्पा गाठेपर्यंत त्याने मजल मारली होती. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी तो हताश झाला आणि सारेच संपले. यापूर्वी पब्जीच्या वेडामुळेच झालेल्या मृत्यूमध्ये तीन युवतींचाही समावेश आहे. 

संपादन : नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide while playing pubg in Nagpur