‘आई तुझ्याशी शेवटचे बोलायचे... मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तुझा आवाज मला ऐकायचा आहे...’

अनिल कांबळे
Wednesday, 3 March 2021

तणावामुळे त्याला दारूचे व्यसन जडले होते. दारू प्यायल्यानंतर आई, वडील आणि नातेवाईकांना फोन करून तो दुःख व्यक्त करीत होता. मंगळवारी सकाळी त्याने वडीलाला फोन केला. त्यावेळी योगायोगाने त्याचे आईवडील नागपुरात नातेवाईकांकडे आले होते.

नागपूर : ‘आई मला तुझ्याशी शेवटचे बोलायचे... मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तुझा आवाज मला ऐकायचा आहे... मला आता जगायचे नाही.. मी आत्महत्या करतोय... मला माफ कर... तू स्वतःची काळजी घे’ असा आईला फोन करून मेट्रोत कर्मचारी असलेल्या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. पराग दिलीप ढोमणे (वय २७, रा. प्रजापतीनगर, वाठोडा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

वाठोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग ढोमणे हा उच्चशिक्षित असून, मूळचा यवतमाळ येथील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याला कंत्राटी पद्धतीवर मेट्रोमध्ये नोकरी मिळाली होती. त्यासाठी तो वाठोड्यातील प्रजापतीनगरात किरायाने खोली करून एकटाच राहत होता. १५ दिवसांपासून तो तणावात होता. त्याने तणावाच्या कारणाबाबत आई-वडिलांशी चर्चासुद्धा केली होती. मात्र, कौटुंबिक वाद सुरू असतानाच तो आत्महत्या करण्याची धमकी देत होता.

जाणून घ्या - पतीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

तणावामुळे त्याला दारूचे व्यसन जडले होते. दारू प्यायल्यानंतर आई, वडील आणि नातेवाईकांना फोन करून तो दुःख व्यक्त करीत होता. मंगळवारी सकाळी त्याने वडीलाला फोन केला. त्यावेळी योगायोगाने त्याचे आईवडील नागपुरात नातेवाईकांकडे आले होते.

वडिलांना फोन करून आत्महत्या करण्याबाबत सांगितले. वडीलाने त्याची समजूत घातली. मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. त्याने आईला फोन देण्यास सांगितले. आईशी बोलल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असून, काही मिनिटातच आत्महत्या केलेली असेल, असे सांगितले.

अधिक माहितीसाठी - ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

मुलाच्या अशा बोलण्यामुळे आई-वडील घाबरले. त्यांनी नातेवाईकाच्या घरून थेट मुलाची खोली गाठली. दरवाजा ठोठवला. मात्र, मुलाने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता पराग गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला आणि धाय मोकलून रडायला लागली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth commits suicide after talking to mother in Nagpur