रात्रीचा खेळ चाले : ‘अबे समजता नही क्या?, ये जगा है क्या बात करणे की’; मग घडला थरार

अनिल कांबळे
Monday, 14 September 2020

कोण शिवीगाळ करीत आहे हे पाहण्यासाठी पलाशचा भाऊ प्रितेश राजू पाटील (२६) घराबाहेर आला. त्याने युवकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, एकाने पिस्तूल काढून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतेशच्या पोटाला स्पर्श करून गेली. त्यामुळे तो जखमी झाला.

नागपूर : वेळ रविवार रात्रीची... काही युवक रस्त्यावर दुचाकी लावून गप्पा करीत होते... दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या कार चालकाने त्या युवकांना हटकले. ‘अबे समजता नही क्या?, ये जगा है क्या बात करणे की’ असे म्हणून कार चालक निघून गेला. आपल्याला दोन गोष्टी सुनावल्याने चिडलेल्या युवकांनी कार चालकाचा पाठलाग केला आणि पुढील घटनाक्रम घडला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश राजू पाटील (रा. अहुजानगर, हुडको कॉलनी) हा रविवारी रात्री कारने घरी जाण्यासाठी निघाला. मिसाळ ले-आउटमधून जास असताना रस्त्यावर दहा ते पंधरा युवक दुचाकी लावून मस्ती करीत होते. पाटीलने त्यांना ‘अबे समजता नही क्या?, ये जगा है क्या बात करणे की, गाडी बाजू करो’ असे म्हणून रस्ता मोकळा करण्यास सागितले.

क्लिक करा -"नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

मात्र, टवाळखोर युवकांनी पलाशची कार थांबवूल वाद घातला. त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. युवक आक्रमक झाल्याचे पाहून तसेच जास्त असल्याने पलाशने जीव वाचवण्यासाठी कारने पळ काढला. मात्र, बदला घेण्यासाठी तसेच पलाशला अद्दल घडवण्यासाठी युवकांनी पाठलाग करून हुडको कॉलनी गाठली. पलाशच्या घरासमोर पोहोचून आरोपींनी आरडाओरड व शिवीगाळ सुरू केली.

कोण शिवीगाळ करीत आहे हे पाहण्यासाठी पलाशचा भाऊ प्रितेश राजू पाटील (२६) घराबाहेर आला. त्याने युवकांना जाब विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, एकाने पिस्तूल काढून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतेशच्या पोटाला स्पर्श करून गेली. त्यामुळे तो जखमी झाला. यानंतर युवकांनी घरासमोरील दुचाकींवर तलवार मारून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

अधिक माहितीसाठी - काही सेकंदात ओळखा तुमच्या अन्नातील भेसळ; हे उपाय करून बघाच

पोलिस पोहोचण्यापूर्वीच युवकांनी काढला पळ

चिडलेले युवक परिसरात आरडाओरड करीत होते. यावेळी सुजान नागरिकाने पोलिसांना सुरू असलेल्या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच युवकांनी पळ काढला. जखमी रितेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर मोठा जमाव जरीपटका पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री एक वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

परिसरात प्रचंड दहशत

जरिपटक्यात फायरिंग झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या भागात गस्त करणारे पोलिस पथके तसेच गुन्हे शाखेचाही ताफा घटनास्थळी धावला. काही पोलिस अधिकाऱ्यांनी मेयोत धाव घेतली. हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचे नाव मेश ठाकरे असल्याचे सांगितले जात होते. जरीपटक्यात रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

हेही वाचा - अरे हे काय... सोन्याचे भाव घटले, तरीही ग्राहक फिरकेना, या महिन्यात दरवाढ होण्याचे संकेत

हल्लेखोरांचा राजकीय पक्षाशी संबंध?

काही युवक आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्याचे पाहून प्रितेश घराच्या पहिल्या माळ्यावरून खाली आला. जाब विचारताच युवकांनी त्याच्यावर गोळीबार केला. जरीपटका पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहे. पोलिसांना पलाशच्या घरात दोन रिकाम्या गोळ्या सापडल्या. पोलिसांनी फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth shot in Nagpur for trivial reasons