इच्छुकांचा जीव टांगणीला!

चेतन देशमुख 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस नेत्यांनाही सत्तेत बसू, अशी चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेने वेळ वाढून मागितल्याने पुन्हा एकदा अनिश्‍चिततेचे सावट पसरले. काय होणार, अशी एकच चर्चा दिवसभर जिल्हाभरात होती.

यवतमाळ : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना मिळून "महाशिवआघाडी' सत्ता स्थापन करणार की, पुन्हा भाजप सरकार स्थापन करणार, यांची उत्सुकता कायम आहे. युती सत्तेत बसल्यास आपले मंत्रिपद पक्के, असा विश्‍वास भाजपचे मदन येरावार, प्रा. डॉ. अशोक उईके व शिवसेनेचे संजय राठोड यांना होता. मात्र, आता समीकरण बदलल्याने शिवसेनेसोबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही मंत्रिपदाचे "वेध' लागले आहे.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे यावेळी मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, यांची उत्सुकता जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना लागली आहे. भाजप-शिवसेना युतीला बहुमत असल्याने युतीचे सरकार येईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. त्यात भाजपकडून यवतमाळ विधानसभेचे आमदार विद्यमान पालकमंत्री मदन येरावार, आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके व शिवसेनकडून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची वर्णी लागण्याची शक्‍यता होती. तशी तयारी दोन्ही पक्षांकडून सुरू होती. मात्र, अचानक सत्तासमीकरण बदलले. राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व शिवसेना अशी "महाशिवआघाडी' असे समीकरण समोर आले. सोमवारी (ता.11) ही आघाडी अस्तिवात येईल, अशी शक्‍यता होती. त्यामुळे शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस नेत्यांनाही सत्तेत बसू, अशी चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेने वेळ वाढून मागितल्याने पुन्हा एकदा अनिश्‍चिततेचे सावट पसरले. काय होणार, अशी एकच चर्चा दिवसभर जिल्हाभरात होती. सरकार कुणाचे? असा एकच प्रश्‍न अनेकांच्या तोंडी होता. सत्तेच्या गणितात सोमवारी (ता.11) रात्री नवे वळण घेतल्याने आता शिवसेना नेत्यांना आपण मंत्री असू की नाही? असा प्रश्‍न पडला आहे. शिवाय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची तशीच स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनाही आपण मंत्रिमंडळात राहू, असे स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे आता कुणाचे स्वप्न खरे ठरणार व कुणाचे स्वप्न भंगणार, याकडे जिल्ह्याचे व भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गुंता वाढला
जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील सर्वाधिक पाच आमदार भाजपचे आहेत. एक राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर एक मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे प्रत्येक एक विधान परिषद सदस्य आहेत. कॉंग्रेसकडे जिल्ह्यात दोन विधान परिषद सदस्य आहेत. अशास्थितीत सत्ता समीकरणात आपल्याला "लॉटरी' लागेल, अशी अपेक्षा सर्वच आमदारांना होती. मात्र, गुंता सुटण्याऐवजी वाढत गेल्याने पुन्हा आता काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

भाजप-शिवसेना समीकरण
भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास 2014 प्रमाणेच यावेळीही मदन येरावार, प्रा. डॉ. अशोक उईके व शिवसेना नेते संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वणी लागण्याची शक्‍यता आहे.

"महाशिवआघाडी'कडे लक्ष

महाशिवआघाडी करीत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास शिवसेना नेते संजय राठोड यांची बढती शक्‍य आहे. याशिवाय कॉंग्रेस कोट्यातून जिल्हाध्यक्ष डॉ. आमदार वझाहत मिर्झा यांचे नाव निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इंद्रनील नाईक यांचे नाव राहील, असे पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा असली तरी यावेळी विदर्भात इतर ज्येष्ठ नेते पुन्हा विधानसभेत पोहोचल्याने कुणाला संधी मिळते, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: इच्छुकांचा जीव टांगणीला!