मौदा एनटीपीसी प्रकल्पात मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

एनटीपीसी प्रकल्पात आज शुक्रवारी (ता. 26) पहाटे 5 वाजता एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. अजय केशव मोटघरे (वय 21 रा. आजनगाव) असे मृताचे नाव आहे. 

एनटीपीसीच्या मशीनमध्ये दबून कामगारांचा मृत्यू
मौदा (जि. नागपूर) : येथील एनटीपीसी प्रकल्पात मशीनमध्ये दबून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. यानंतर महाव्यवस्थापकांच्या घरावर दगडफेक करून कामगारांनी रोष व्यक्त केला. कामगारांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार केल्याने परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती. अजय केशव मोटघरे (वय 21, रा. आजनगाव) असे मृत कामगाराचे नाव असून अन्य दोघे जखमी आहेत.
गुरुवारी रात्रपाळीसाठी अजय दहा वाजता एनटीपीसीच्या कोळसा हाताळणी विभागात कामावर आला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास काम करीत असताना येथे असलेल्या बिटल (साईड आर्म चार्ज) मशीन व कोळशाची वॅगन यामध्ये तो अडकला. तेथेच दबून त्याचा मृत्यू झाला. बिटलवरील अलार्म बंद असल्याने ही घटना घडल्याची माहिती कामगारांनी दिली. अजयच्या मृत्यूने संतापलेले सर्व कामगार सकाळी सहाच्या सुमारास काम सोडून बाहेर आले. हजारो कामगार एनटीपीसी कार्यालयासमोर एकत्र झाले. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अजयचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला. कामगारांनी नारेबाजीला सुरुवात केल्याने एनटीपीसी प्रशासनाने मौदा पोलिसांना बोलावून घेतले. यामुळे कामगारांच्या असंतोषाच भर पडली.
यानंतर संतप्त कामगार मुख्य महाव्यवस्थापक आलोक गुप्ता यांच्या बगल्यासमोर जमले. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. यात मयूर ठाकरे (वय 23, रा. धामणगाव), शुभम श्रीरामे (वय 30, रा. खंडाळा) व पोलिस किरकोळ जखमी झाले. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पुझ्झलवार, मौद्याचे ठाणेदार मधुकर गीते यांनी तणाव निवळावा यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी अतिरिक्त ताफा बोलावून घेतला होता.
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार प्रशांत सांगडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक आलोक गुप्ता यांच्याशी चर्चा करून कुटुंबीयांना 35 लाख रुपयांची मदत, पेन्शन व एका व्यक्तीला प्रकल्पात नोकरी असा करार करण्यात आला. यानंतर तणाव निवळला. अपघातानंतर अजयचा मृतदेह एनटीपीसीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला होता. दुपारी 12 वाजता मृतदेह शवविच्छेदनानंतर नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 labor stuck in machine and die at Mauda NTPC project Nagpur