esakal | अबब..! १० हजारांत पाच लाखांचे कर्ज; पोलिसांनी आयोजकांना घेतले ताब्यात

बोलून बातमी शोधा

10 lakh to five lakh loan Police arrested the organizers}

सदर एनजीओ लाभार्थ्यांकडून दहा हजार २५० रुपये विमा काढण्याच्या पोटी लाभार्थ्यांकडून जमा करीत होते. पाच लाख रुपये कर्ज पाहिजे असल्यास त्यांना ते ५५ हप्त्यात परत करावे लागणार असे लाभार्थ्यांना सांगण्यात येत होते.

अबब..! १० हजारांत पाच लाखांचे कर्ज; पोलिसांनी आयोजकांना घेतले ताब्यात
sakal_logo
By
मंगेश वणीकर

हिंगणघाट (जि. वर्धा) : दहा हजार २५० रुपये विम्याची रोख रक्कम दिल्यास पाच लाख कर्जाच्या विदेशी बॅंकेचा धनादेश तुमच्या हातात अशी शक्कल लढवून लोकांकडून पैशाची लूट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एनजीओची बनवेगिरी पोलिसांनी उघड केली आहे. कर्ज देण्याचे आमिष देऊन लाखो रुपये उकळण्याचा हा डाव फसला असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येते असून, यातून मोठे घबाड बाहेर येण्याची शक्‍यता आहे.

महाकाली नगरीत खुल्या जागेवर मंडप उभारून एनजीओमार्फत कर्जाचे वाटप करण्यात येते होते. यासाठी शेकडो लाभार्थी येथे दूरदूरहून येथे आलेले होते. कर्जाच्या नावावर येथे फसवणूक होत असल्याची माहिती पोलिस आणि महसूल विभागाला मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना कर्ज वाटपाची भन्नाट योजना या स्थळावर निदर्शनास आली.

अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली

सदर एनजीओ लाभार्थ्यांकडून दहा हजार २५० रुपये विमा काढण्याच्या पोटी लाभार्थ्यांकडून जमा करीत होते. पाच लाख रुपये कर्ज पाहिजे असल्यास त्यांना ते ५५ हप्त्यात परत करावे लागणार असे लाभार्थ्यांना सांगण्यात येत होते. सुरक्षेपोटी लाभार्थ्यांकडून तीन कोरे धनादेश स्वीकारण्यात येत होते. या लाभार्थ्यांकडून आधीच प्रत्येकी शंभर रुपये घेऊन अर्ज भरून घेण्यात आलेले होते. कर्ज मंजूर झालेल्यांना आज कर्ज वाटप करण्यासाठी बोलाविण्यात आलेले होते.

पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत सुमारे ४२ लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दहा हजार २५० रुपये घेण्यात आलेले होते. या सवर्त्तंना जे ट्रस्ट बॅंक, इंडोनेशिया या विदेशी बॅंकेचा धनादेश त्यांना देण्यात आले होते. हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व रक्कम आणि साहित्य जप्त करून चौकशी सुरू केलेली आहे.

चौकशी नंतरच सत्य पुढे येईल
लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या धनादेश हा विदेशी बॅंकेचा असून प्रथमदर्शनी हे धनादेश खोटे असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबतची सत्यता तपासण्यासाठी स्टेट बॅंकेकडून माहिती मागविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी नंतरच सत्य पुढे येईल.
-  संपत चव्हाण, ठाणेदार

जाणून घ्या - "आई तुझा प्रॉब्लेम काय आहे?" असं विचारत अवघ्या १६ वर्षांच्या मुलीनं घेतला गळफास; हृदयद्रावक घटना

महसूल आणि पोलिस प्रशासनाने केला वीस हजारांचा दंड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून शेकडो लोकांची गर्दी जमविल्या प्रकरणात व्हीजन ऑफ लाइफ फाउंडेशनच्या प्रमोदणी राजेश आस्कर यांच्याकडून महसूल आणि पोलिस प्रशासनाने २० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. उपविभागीय अधिकारी निशिकांत खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार समशेर पठाण आणि ठाणेदार संपत चव्हाण यांनी ही कारवाई केली.

सिंधखेडराजा येथून आले लाभार्थी

या कर्जवाटपाचा लाभ घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा येथून आठ लाभार्थी येथे आलेले होते. त्यांनी महिन्याभरपूर्वी नागपूरला कर्ज मागणीचे फार्म भरले होते. तुमचे कर्ज मंजूर झालेले आहे तुम्ही हिंगणघाट येथे कर्ज वाटप मेळाव्यात येऊन दहा हजार २५० रुपये भरून आपले धनादेश घेऊन जावे, असे सांगण्यात आलेले होते. तेही या चक्रव्यूहात अलगद अडकले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनीही पोलिस ठाणे गाठून आपल्या व्यथा सांगितल्या.