अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास 10 वर्षांची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

अमरावती - चिखलदरा तालुक्‍यात बदनापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीला अचलपूर येथील अप्पर जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. 

अमरावती - चिखलदरा तालुक्‍यात बदनापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीला अचलपूर येथील अप्पर जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. 

रामू रामलाल ऊर्फ खोडे बेलसरे (वय 28, रा. बदनापूर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोषारोपपत्रानुसार चिखलदरा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रामू बेलसरे याच्याविरुद्ध 16 जुलै 2014 ला बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या भावाचा भ्रमणध्वनी आणण्यासाठी आरोपी रामू बेलसरे याच्या घरी गेली होती. मात्र, त्याने भ्रमणध्वनी स्वतःच नेऊन दिला. तोपर्यंत संबंधित मुलगी त्याच्या घरी बसून होती. तो परत येत असल्याचे पाहून ती घराकडे निघाली असता त्याने वाटेत तिला गाठून व एका घरामागे नेऊन तिच्यावर जबरीने अत्याचार केला होता. ठाणेदार एन. एम. गवारे यांनी तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले होते. 

अचलपूर येथील अप्पर जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. पाटकर यांच्या न्यायासनासमक्ष या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे ऍड. डी. ए. नवले यांनी एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दहा वर्षे कारावासाची तसेच दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार, पोलिस निरीक्षक पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलदरा ठाण्यातील हवालदार सतीश भदे, प्रकाश काळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. 

Web Title: 10 years of punishment for raping a girl