बचतगटांच्या निधीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली मोठी घोषणा...वाचा सविस्तर

file photo
file photo

अमरावती : जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांना पतपुरवठ्यासाठी १०० कोटी रुपयांपर्यंत निधीची तयारी जिल्हा सहकारी बॅंकेने दर्शवली आहे. त्यानुसार महिला विकास आर्थिक महामंडळाकडून महिला बचतगटांना उद्योग, व्यवसायासाठी पतपुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतचे आवश्‍यक सामंजस्य करार, कार्यप्रणाली आदी प्रक्रिया होत असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज शुक्रवारी (ता. २१) धामणगाव काटपूर येथे दिली.

मोर्शी तालुक्‍यातील धामणगाव काटपूर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, दिशा प्रकल्प व माहेर लोकसंचालित साधन केंद्रातर्फे आयोजित स्वयंसहायता समूहांच्या प्रगतीचा आढावा व व्यापार सखींशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, माजी सरपंच रेखा वानखडे, अर्चना खांडेकर यांच्यासह विविध समूहांच्या महिला सदस्य व गावकरी यावेळी उपस्थित होते.

महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी माविमच्या बचत गटांना दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, अमरावती जिल्ह्यात जिल्हा सहकारी बॅंकेच्या सहकार्याने बचत गटांना पतपुरवठ्यासाठी शंभर कोटी रुपये निधीची योजना आकारास येत आहे. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असा उपक्रम राबविण्यात येईल.

महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल

स्वयंसहायता समूहांना बळ देऊन महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबात महिला ही कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचाही आधार असते. त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम व योजना हाती घेण्यात आल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बळकटीकरणासाठीही नियोजन होत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कृषीरथाला हिरवी झेंडी

प्रकल्पाद्वारे अर्थसाह्याच्या धनादेशाचे वितरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. गुलाबी बोंडअळी जनजागृती मोहिमेच्या कृषीरथाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ कार्यक्रम, तसेच वृक्षारोपण कार्यक्रम पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी झाला. श्रीमती खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश घार यांनी आभार मानले.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com