होळीचा आनंदोत्सव जीवावर बेतला आणि गेले 12 जीव!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

होळी व धुळवडीच्या आनंदमय पर्वावर विदर्भात विविध ठिकाणी घडलेल्या विविध घटनांमध्ये तब्बल 12 लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

नागपूर : होळी व धुळवडीच्या आनंदमय पर्वावर विदर्भात विविध ठिकाणी घडलेल्या विविध घटनांमध्ये तब्बल 12 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सहा, चंद्रपूर चार तर अमरावती जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. 

वीजप्रवाह असलेल्या कुंपणाने घेतला जीव

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्‍यात मंगळवारी, धुळवडीच्या दिवशी जंगली प्राण्यांकडून पिकांची नासाडी होऊ नये म्हणून शेताच्या वीजप्रवाह सोडलेल्या कुंपणाला स्पर्श झाल्याने वासुदेव सूर्यभान फाले (वय 38) या शेतगड्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत मंगळवारी (ता. दहा) दुपारच्या सुमारास रानडुकराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आत्माराम मंगल दिगुरे (वय 60, रा. कोंढा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरभऱ्याची राखण करण्यासाठी ते दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. 

मित्राला वाचविताना युवकाचा मृत्यू

आर्णी (जि. यवतमाळ) : नदीत पोहताना मित्र पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राचा आर्णीतील अरुणावती नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.11) दुपारी साडेबारा दरम्यान घडली. सूरज विलास रामनबोईनवार (वय 22, रा. कोळवण) असे मृताचे नाव आहे. धूलिवंदनच्या दुसऱ्या दिवशी आज आंघोळीसाठी चार ते पाच मित्र आर्णी येथील अरुणावती नदीवर गेले होते. 

अपघातात युवक ठार

उमरखेड (जि. यवतमाळ) : धुळवडीच्या पर्वावर हर्षी येथील महादेव मंदिरात दर्शन करून परतीच्या प्रवासास निघालेल्या उमरखेडच्या गोविंदा लक्ष्मण साखरे (वय24, रा. महात्मा फुले वॉर्ड) या युवकाला पळशीजवळ अपघात होऊन तो जागीच ठार झाला. 

नाव उलटल्याने मृत्यू 

शिंदोला (जि. यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या पाथरी येथे पैनगंगा नदीत धुळवडीच्या दिवशी नाव उलटून विलास गजानन सोयाम (वय 28, रा. बोरगाव, ता. कोरपणा जि. चंद्रपूर) या युवकाचा मृत्यू झाला. तो वणी तालुक्‍यातील शिंदोला येथील सुभाष बोरडे यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला होता. मंगळवारी (ता.10) सायंकाळी पाचच्या सुमारास पैनगंगा नदीपात्रातून नावेने जात असताना नाव पाण्यात उलटून हा नावेखाली दबला गेल्यामुळे त्याला निघता आले नाही. 

अवश्य वाचा- पतीजवळ सापडली दारूची बाटली...मग काय, पत्नीने धारण केले रणचंडिकेचे रूप!

व्यक्तीचा मृतदेह आढळला

नेर (जि. यवतमाळ) : रात्री पानटपरीवरून येतो असे सांगून घरून गेलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.10) सकाळी तालुक्‍यातील अजंती ते बाळेगाव फाट्याजवळ मृतदेहच आढळला. त्यामुळे हा अपघात की घातपात, अशा चर्चेला शहरात उधाण आले आहे. अमोल बबन गौरखेडे (वय 33, रा. अशोक नगर, नेर) असे मृत अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात चार जणांचा बुडून मृत्यू 

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र रंगाची उधळण सुरू असतानाच रंग खेळल्यानंतर नदी, नाल्यात अंघोळीसाठी गेलेल्या चार जणांना मंगळवारी (ता. 10) जीव गमवावा लागला. गोंडपिपरी, पोंभुर्णा, वरोरा आणि ब्रह्मपुरी तालुक्‍यात या घटना घडल्या. 
गोंडपिपरी तालुक्‍यातील नांदगाव येथील संस्कार संजय मोगरे (वय 11) या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संस्कार मित्रांसोबत होळी खेळल्यानंतर खदानीवर अंघोळीसाठी गेला होता. वरोरा शहरातील अंकित गोपाळराव पिंपळशेंडे (वय 26) हा होळी खेळल्यानंतर आठ-नऊ मित्रांसह मारडा नदीवर पोहण्यासाठी गेला होता. तसेच अखिल दिवाकर कामीडवार (वय 27) मित्रांसोबत अंधारी नदीवर अंघोळीसाठी गेला. मात्र पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. 
ब्रह्मपुरी तालुक्‍यातील खरकाडा गावाजवळील वैनगंगा नदीतसुद्धा अशीच घटना घडली. कैलास यादव ढोरे (वय 26) असे मृतकाचे नाव आहे. तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील कुरूड येथील आहे. त्याची बहीण खरकाडा येथे राहत. तो पायदळ वैनगंगेच्या पात्रातून बहिणीच्या गावाकडे धुळवड आटोपल्यानंतर यायला निघाला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. 

दारूपार्टीनंतर युवकाचा खून

अमरावती : मार्डी मार्गावरील एका लॉनमध्ये धुळवडीची कर साजरी करण्यासाठी आयोजित पार्टीमध्ये झालेला वाद पेटला. त्यावरून युवकांचे दोन गट समोरासमोर उभे ठाकले. त्यात एकाचा खून, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मंगळवारी (ता. 10) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे अमरावती शहरात होळीच्या सणाला गालबोट लागले. अंकुश उर्फ अंकित सदानंद तायडे (20 रा. प्रबुद्धनगर, वडाळी) असे मृत युवकाचे नाव आहे. तर दुसऱ्या गटातील मनीष प्रकाश बाहेकर (वय 23 रा. जलारामनगर) हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

अवश्य वाचा- खुप रंग खेळला , नंतर अंघोळ करायला मित्रासह खदानीवर गेला...

बहीण-भावावर प्राणघातक हल्ला

अमरावती : नांदगावखंडेश्वर तालुक्‍याच्या मंगरुळचव्हाळा गावात मेहुण्याने पळून जाऊन युवतीसोबत लग्न केले. त्याचा राग जावयावर निघाला. जावयासह त्याच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. मनीष इंग्लिश भोसले (वय 29) व मनीषा अगिन पवार (दोघेही रा. मंगरुळचव्हाळा) असे हल्ल्यातील जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर प्रवीण पवार, मलेश प्रकाश पवार या दोघांनी हल्ला केला होता. 

मोगर्दा येथे होळीच्या दिवशी खून

अमरावती : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून सुरू असलेला वाद पेटला. त्यामुळे हातपाय बांधून काठीने आधी मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून खून केला. ही घटना होळीच्या दिवशी सोमवारी (ता. नऊ) मोगर्दा गावात घडली. हरीश बळीराम सावलकर (वय 37, रा. मोगर्दा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हरीश हा बळीराम यांना पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीलासुद्धा मुले आहेत. वडिलोपार्जीत शेतीचा हिस्सा मागण्यावरून वडील, सावत्र आई व भावासोबत हरीश यांचा वाद सुरू होता. घटनेच्या दिवशीसुद्धा त्यांचे भांडण झाले. वडील बळीराम मंगल सावलकर (वय 50), भाऊ राजेश बळीराम सावलकर, जावई रवींद्र मावस्कर, एक युवती व महिला, अशा पाच जणांनी हरीश यास पकडून त्याचे दोरीने आधी हातपाय बांधले व काठीने मारहाण केली. त्यानंतर महिलांच्या मदतीने गळा आवळून हरीश सावलकर याचा खून केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 lost their lives on a day of Holi