रेल्वेतून उतरताच पत्नीच्या कानावर पडला बाटलीचा आवाज अन् घडला हा प्रकार...

रेल्वेतून उतरताच पत्नीच्या कानावर पडला बाटलीचा आवाज अन् घडला हा प्रकार...

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी आहे. दुप्पट किंमतीने दारू विकत घ्यावी लागते. सणासुदीच्या दिवसात किंमती आणखी वाढतात. त्यामुळे जिथे दारू सुरू आहे. तिथे कामानिमित्त गेले की, एक-दोन बाटल्या खिशात टाकून आणणारे जिगरबाज अलिकडे तयार झाले आहेत. पोलिसांना चकवून दारू आणण्याचे कौशल्य तस्करांसह वैयक्तिक रित्या अनेकांनी मिळविले आहेत. अशाच पध्दतीने पतीने दारू तस्करीचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने पतीला थेट ठाण्यात नेले. हा प्रकार दिवसभर चर्रचा विषय झाला होता. 

नागपूरला पत्नी आणि मुलासह गेलेल्या पतीने धुळवडीत घसा ओला व्हावा म्हणून दारू विकत घेतली. त्याने ती हुशारीने बॅगमध्ये लपवून ठेवली मात्र प्रवासादरम्यान पत्नीला दारू दिसली. तिने थेट रणचंडीकेचा अवतार धारण केला. तिचे ते रूप पाहून नवऱ्याने देखील नवी शक्कल लढविली. दारूफेकतो, असे सांगून त्याने ती रेल्वेच्या शौचालयात लपवली व चंद्रपूर गाठले. पत्नीने सामान घेतले आणि त्याने दारू खिशात टाकली. यावेळी मात्र पतीची चोरी उघड झाली आणि पत्नी थेट पोलिस ठाण्यात पोहचली.

जिल्ह्यात दारूबंदी आहे. दुप्पट किंमतीने दारू विकत घ्यावी लागते. सणासुदीच्या दिवसात किंमती आणखी वाढतात. त्यामुळे जिथे दारू सुरू आहे. तिथे कामानिमित्त गेले की, एक-दोन बाटल्या खिशात टाकून आणणारे जिगरबाज अलिकडे तयार झाले आहेत. पोलिसांना चकवून दारू आणण्याचे कौशल्य तस्करांसह वैयक्तिक रित्या अनेकांनी मिळविले आहेत. त्यातीलच हे एक महाशय. चंद्रपुरातील हे दाम्पत्य मुलासह नातेवाईकाकडे नागपुरला गेले होते. होळी घरीच साजरी करावी यासाठी ९ मार्चला दुपारी नागपूवरून रेल्वेने चंद्रपुराला निघाले.

धुळवडीसाठी नागपुरातून घेतली दारू
तत्पूर्वी पतीने रेल्वे स्थानकासमोरील दारूच्या दुकानातून धुळवडीत घसा कोरडा नको म्हणून विदेशी दारूच्या दोन बॉटल घेतल्या. रेल्वे पोलिस आणि पत्नीची नजर चुकवून पती दारूसह रेल्वेत बसला. प्रवासादरम्यान पतीकडे दारूच्या बाटल्या असल्याचे पत्नीच्या लक्षात आले. तिने रेल्वेत प्रवाशांसमोरच पतीला आडव्या हाताने घेतले. त्याचा नाईलाज झाला. मात्र त्याने हार मानली नाही. दारू फेकून देतो म्हणून गेला आणि शौचालयात लपवून आला.

रंगपंचमीला आता पती पिणार नाही म्हणून पत्नी आनंदी होती. लपवलेली दारू शौचालयात सुखरूप राहील की नाही, याची चिंता पतीला सतावत होती.  अडीच तासांच्या प्रवासानंतर चंद्रपूर रेल्वेस्थानक आले. पत्नीने सामान हाती घेतले आणि तो लघुशंकेच्या बहाण्याने शौचालयात घुसला. आपल्या किंमती वस्तू त्याने खिशात टाकल्या आणि युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात बाहेर पडला. त्यांच्या चेहऱ्यावर पत्नीला मुर्ख बनविल्याचा आणि उद्याच्या रंगपंचमीचे जुगाड झाल्याचा विलक्षण आनंद होता. तो क्षणभरच टिकला. रेल्वेच्या दारातून बाहेर पडल्यानंतर खिशात ठेवलेल्या बॉटलचा आवाज पत्नीच्या कानावर पडला. तिने तो बरोबर टिपला आणि नवऱ्याच्या खिशात दारू असल्याची खात्री पटली. त्यानंतर पत्नीचा संयम सुटला.

त्याचा पुन्हा जाहीर उद्धार केला. "दारू फेका नाही तर पोलिसात जाते", अशी धमकी दिली. मात्र हा जिगरबाज पोकळ धमकी समजून बसला आणि इथेच फसला. पतीला तिथेच सोडून मुलाला सोबत घेतले आणि पत्नीने थेट रामगनर ठाणे गाठले. तिने पती विरोधात लेखी तक्रार देण्यासाठी तोंड उघडले आणि पोलिसही चक्रावून गेले.

एरवी दारूतस्कारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांसमोर खुद्द पत्नीच पतीकडे दारू असल्याची तक्रार देण्यासाठी आली होती. पोलिसांनी पतीशी  संपर्क साधला आणि त्याला ठाण्यात बोलवले. तोही निमूटपणे आला. तेव्हा त्याच्याकडे दारू नव्हती. पत्नीला मात्र त्याच्यावर विश्वास नव्हताच. कुठेतरी लपवून ठेवली किंवा मित्रांकडे विल्हेवाट लावली असावी. तुम्ही शोध घ्या, असा सल्ला पत्नी वारंवार पोलिसांना देत होती. पोलिसांनी पतीची समजूत काढली. त्याच्याकडून दारूपिणार नाही, असे वदवून घेतले. होळीच्या दिवशी कुटुंबात धुडवळ नको म्हणून पत्नीनेही शेवटी सांमजस्याने घेतले. तक्रार दिली नाही आणि दीड-दोन तासांच्या दारूनाट्याचा शेवट झाला. पत्नी सामानसह आणि पती रिकाम्या हाताने उद्याचे कसे? या चिंतेत घरी परतला. 

पत्नी ठाण्यात आली
पतीची तक्रार देण्यासाठी पत्नी ठाण्यात आली होती. मात्र पतीने सोबत दारू नाही आणि पिणारही नाही, असे पोलिसांसमोर कबुल केले. त्यामुळे पत्नीने पोलिसात तक्रार दिली नाही. 
- प्रकाश हाके
पोलिस निरीक्षक, रामनगर, चंद्रपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com