बिबट्याने केली 14 बकऱ्यांची शिकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : तालुक्‍यातील खैरी पन्नासे शिवारातील एका शेताच्या गोठ्यात असलेल्या 14 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खैरीच्या नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.

हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : तालुक्‍यातील खैरी पन्नासे शिवारातील एका शेताच्या गोठ्यात असलेल्या 14 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खैरीच्या नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.
खैरी पन्नासे येथील शेतकरी अशोक विठ्ठल केवटे यांच्या शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठा आहे. हिंस्त्र श्‍वापदांपासून रक्षण व्हावे यासाठी गोठ्याला तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. या गोठ्यात गायी, बैल व बकऱ्या बांधून होत्या. केवटे यांच्या गोठ्यात चंदन भिवाजी कांबळे हेदेखील त्यांच्या बकऱ्या बांधून ठेवत होते. गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी गोठ्यात बकऱ्या बांधून घरी परतले. शुक्रवारी सकाळी परत गोठ्यावर गेले असता त्यांना 14 बकऱ्या मृत पडून दिसल्या. त्याच शेतात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. यात केवटे व कांबळे यांच्या मालकीच्या अनुक्रमे 12 व 2 अशा बकऱ्यांचा फडशा बिबट्याने पाडला. याशिवाय बिबट्याने गायीच्या एका वासरालासुद्धा जखमी केले. या घटनेची माहिती हिंगणा पोलिस व वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. हिंगणा शहरालगत ही गावे असून या परिसरात बिबट्या आल्याने दहशत पसरली आहे. त्याचबरोबर या शेतात दोन प्रकारचे बिबट्याचे पायाचे ठसे आढळले. बिबट्यासोबत बछडा असावा, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 goats hunted by Bibot