वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांत 16 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नागपूर - राज्यात गेल्या सात महिन्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 11 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात झाले आहेत; तर चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

नागपूर - राज्यात गेल्या सात महिन्यांत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक 11 मृत्यू वाघांच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात झाले आहेत; तर चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध प्रकल्प, विकासकामांमुळे वन्य जीवांचा अधिवास कमी होत आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच अभयारण्यांतील बफर आणि गावांमध्ये सुरु झाला आहे. वाघ आणि अस्वलांचे वास्तव्य असलेल्या भागात हा संघर्ष अधिक तीव्र आहे. जंगलात जाण्यास गावकऱ्यांना मज्जाव केल्यानंतरही सरपण आणि वनोपजांसाठी जंगलात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासाठी गावकरी पहाटे जंगलात जातात तेव्हा वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. सरपण उचलण्यात गुंतलेल्या गावकऱ्यांवर वन्यप्राणी अचानक हल्ला करतात.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या शेजारील परिसरातही वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेच जंगलाचे क्षेत्र कमी पडत असल्याने या जिल्ह्यातील वाघ इतरत्र संचार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाईही होऊ लागली आहे. त्यात वाघांचा मृत्यू होत असताना मानव-वन्य प्राण्यांचा संघर्षही वाढला आहे. वाघ खाद्य आणि पाण्याच्या शोधात जंगलाशेजारील गावात प्रवेश करतात. गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह कधी मानवावरही हल्ला होतो. वन विभागाकडील आकडेवारीनुसार गेल्या सात महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन; तर उर्वरित नऊ घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रांत घडल्या आहेत. याशिवाय नाशिक वन वृत्तात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा तर कोल्हापूर जिल्ह्यात गव्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

जंगलाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ
तज्ज्ञांच्या अहवालानुसार चंद्रपूर जिल्ह्यात जंगल क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा वाघांच्या संख्या अधिक झालेली आहे. त्यामुळेच मानव-वाघांमधील संघर्ष वाढला आहे. या ठिकाणी आता खाद्यान्नाचीही कमतरता आहे. सर्वाधिक मानव-वन्यजीव संषर्घ याच वन विभागात अधिक आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. इतरत्र वाघांना स्थलांतरित करा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Web Title: 16 death in wild animal attack