पूर्व विदर्भात डॉक्टरांसह १७ कोरोना योद्ध्यांचा मृत्यू, एकूण १७५२ जणांना बाधा

17 covid worriers died till in east vidarbha
17 covid worriers died till in east vidarbha

नागपूर : पूर्व विदर्भात ११ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित नागपुरात आढळला. तेव्हापासून तर आजपर्यंत कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांपासून तर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह इतरही पॅरामेडिकल कर्मचारी अहोरात्र फ्रंटफूटवर लढा देत आहेत. पीपीई किटसह सुरक्षेची सर्व साधने असतानाही पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील आणि खासगी सेवेतील १७५२ डॉक्टर, परिचारिकांसह इतर वैद्यकीय कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. यात १३४१ जण सरकारी रुग्णालयातील, तर ४११ खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. यातील १७ जणांना सेवेदरम्यान आपले प्राण गमवावे लागले. 

कोरोनाची दहशत सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी असलेल्या प्रोटोकॉलचे पालन करीत सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, तसेच सफाई कामगारांपासून, तर परिचर खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून सेवा देत आहेत. विशेष असे की, कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा ते कोरोनाबाधितांची सेवा करण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी कोरोनाच्या कुरुक्षेत्रात पुढे येत आहेत. मात्र, या आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथील जिल्हा, तालुक्यातील सरकारी आणि खासगीतील एकूण ६१५ डॉक्टर, ३४१ परिचारिका तसेच ७९६ इतर कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातील १७ जण आतापर्यंत दगावले आहेत. यात ८ डॉक्टर, तर उर्वरित ९ इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी कोविड सेंटरमध्येही कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण विभागापासून तर वॉर्डात डॉक्टर, परिचारिका 24 तास कार्यरत होते. या बाधितांमध्ये मेयो, मेडिकलमधील बाधितांचा समावेश नाही. 

डागातील परिचारिकेचा मृतांमध्ये नाही समावेश - 
कोरोनाबाधित मृतांच्या नोंदीत एकाही परिचारिकेच्या मृत्यूची नोंद नाही. मात्र, डागा रुग्णालयातील कोरोनाबाधितांची सेवा करताना बाधित झालेल्या वंदना केवटे या परिचारिकेचा मृत्यू मेडिकलमध्ये झाला आहे. ही नोंद व्हावी यासाठी संघटनांकडून पुढाकार घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

वैद्यक क्षेत्रातील कोरोनाबाधित - 

रुग्णालय डॉक्टर परिचारिका इतर कर्मचारी
सरकारी रुग्णालय ३५२ २८९ ७००
खासगी रुग्णालय २६३ ५२ ९६

संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com