अखेर सोनुली गावाला मिळणार पाणी, १७ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर

भोजराज नवघडे
Monday, 26 October 2020

देवपायली येथील माता माणकादेवीच्या मागीलवर्षी झालेल्या नवरात्र उत्सवात ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी देवपायली व सोनुली येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मांडला होता.

नागभीड (जि. चंद्रपूर): तालुक्‍यातील देवपायली ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सोनुली (खुर्द) या आदिवासी बहुल व जंगलव्याप्त गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला आता यश आले. 

हेही वाचा - स्वयंसिद्धा: कार्यक्रमांना अविस्मरणीय करण्याचे कसब;...

देवपायली येथील माता माणकादेवीच्या मागीलवर्षी झालेल्या नवरात्र उत्सवात ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी देवपायली व सोनुली येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मांडला होता. याची जाणीव ठेवत जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे या गावच्या योजनेसाठी पाठपुरावा सुरू केला. दरम्यानच्या काळात कार्यकारी अभियंता पिपरे, भूजल विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक दुबे, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता जी. एस. बारसागडे , कनिष्ठ अभियंता एम. के.नंदेश्‍वर यांच्या चमूने देवपायली, सोनुली परिसरातील जलस्त्रोताची पाहणी केली. दोन्ही गावांतील लोकसंख्या व अंतर लक्षात घेता दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कराव्या लागतील, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.  त्यानुसार देवपायली व सोनुली, अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना संदर्भात अंदाजपत्रके विभागामार्फत तयार करण्यात आली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते , आमदार भांगडिया, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे संजय गजपुरे यांनी पाठपुरावा केला. अखेर मंजुरी मिळाली. 

हेही वाचा - कंपनीला कोणतीही सूचना न देता उघडली स्वतःची एजन्सी; केला अठरा लाखांचा अपहार

सध्या सोनुली येथे 17 लाख 19 हजार 785 रुपये किंमतीची योजना मंजूर झाली आहे. येत्या सहा महिन्यांत ही योजना पूर्णत्वास येणार आहे. लवकरच देवपायलीसह नवेगाव, हुंडेश्‍वरी, कोसंबी गवळी या गावांचीही नळ पाणीपुरवठा योजना अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल उपरोक्त लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे संजय गजपुरे यांनी आभार मानले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 lakh water supply scheme approved for sonuli village in nagbhid of chandrapur