कंपनीला कोणतीही सूचना न देता उघडली स्वतःची एजन्सी; केला अठरा लाखांचा अपहार

योगेश बरवड
Monday, 26 October 2020

एकाचवेळी सर्व पैसे देणे शक्य नसल्याने पाच धनादेश देत त्याने वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला. कंपनीने ठरलेल्या वेळेत धनादेश बँकेत टाकले पण एकही चेक वटला नाही. याप्रकरणी मनोजच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा नोंदवित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नागपूर : सिनियर एक्झीकेटीव्ह असीस्टंटनेच टूर कंपनीची १८ लाखांनी फसवणूक केली. त्याची भानगड उघडकीस आल्यानंतर चेकद्वारे परतावा देण्याची तयारीही दर्शविली. पण, त्याने दिलेल्या पाच पैकी एकही धनादेश वटला नाही. कंपनीने तक्रार दाखल केल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेंद्र सहारे (३६, रा. विवेकानंद कॉलनी, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवरीनगर, वाठोडा येथील रहिवासी मनोज गुप्ता (३६) याचे सी हॉलिडे नावाची टूर कंपनी आहे. अंबाझरी हद्दीत वेस्ट हायकोर्ट रोड, गोकूळपेठ येथे कार्यालय आहे. या कंपनीत सहारे हा ऑगस्ट २०१८ पासून कामाला होता. त्याने कंपनीला कोणतीही पूर्व सूचना न देता नियमबाह्य पद्धतीने स्वतःची एजन्सी तयार केली.

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

विदेशात जाऊ इच्छीणाऱ्या ग्राहकांची तो एजन्सी मार्फत नोंदणी करून पैसे घ्यायचा. अशापद्धतीने त्याने १८ लाख गोळा केले. ते पैसे कंपनीत जमा न करता स्वतः वापर केला. ही बाब समोर आल्यानंतर २६ ऑक्टोबर २०१९ रोजी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यावेळीच त्याने अपहाराची कबुली देत १८ लाख रुपये भरून देण्याची ग्वाही शपथपत्राद्वारे लेखी स्वरूपात दिली होती.

एकाचवेळी सर्व पैसे देणे शक्य नसल्याने पाच धनादेश देत त्याने वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला. कंपनीने ठरलेल्या वेळेत धनादेश बँकेत टाकले पण एकही चेक वटला नाही. याप्रकरणी मनोजच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा नोंदवित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

बँक खत्यातून २४ हजार लंपास

पेटीएमचे केवायसी करून घेण्याची थाप मारून ग्राहकाच्या खात्यातून २३ हजार ८०० रुपये लंपास केल्याचे प्रकरण सोनेगाव हद्दीत उघडकीस आले आहे. सोनेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकाला मार्च महिन्यात दुपारी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने पेटीएम अकाउंट बंद होणार असल्याचा इशारा देत केवायसी करून घेण्याची सूचना केली. सोबतच बोलताना त्यांच्या खात्याविषयीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून २३ हडार ८०० रुपये वळते करण्यात आल्याचा मॅसेज आला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी फसवणुकीसह व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात

साडेपाच लाखांच्या पेपर रोलची चोरी

खसाळा भागातील गोडावूनमधून साडेपाच लाख रुपये किमतीचे पेपर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. कुशीनगरातील रहिवासी ऋषभ आहुजा (२०) याचे खसाळा स्मशान घाटाजवळ पेपरचे गोडावून आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर पेपरचे रोल ठेवले जातात. ५ ते १८ सप्टेंबर दरम्यान चोरट्याने एकूण ५ लाख ५० हजार ९५६ रुपये किमतीचे पेपरचे १८९ बंडल चोरून नेले. याप्रकरणी ऋषभच्या तक्रारीवरून कपीलनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of tour company in Nagpur