पालकांनो! 'RTE'साठी उरला शेवटचा दिवस, राज्यात तब्बल २९ हजार ४७३ जागा रिक्त

रूपेश खैरी
Sunday, 17 January 2021

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण आरटीई कायद्यान्वये राज्यातील ९,३३१ खासगी शाळांमधील १ लाख १५ हजार ४७७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहे.

नंदोरी (जि. वर्धा) :  राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रवेश प्रक्रियेला सहाव्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय शासन विभागाने घेतला. त्यानुसार सोमवार (ता. १८) पर्यंत प्रतीक्षा यादीतील पालकांना पाल्यांच्या प्रवेश निश्‍चिती करता येणार आहे. त्यांनतरही राज्यात हजारो जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण आरटीई कायद्यान्वये राज्यातील ९,३३१ खासगी शाळांमधील १ लाख १५ हजार ४७७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहे. पालकांच्या उदासीनतेमुळे वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील ८६००४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहे, तर अद्यापही राज्यातील २९,४७३ जागा तर नागपूर विभागातील ३,३४१ जागा रिक्तच आहे. नागपूर विभागात सर्वाधिक रिक्त जागा नागपूर जिल्ह्यात १९८६ जागा रिक्त आहेत, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ५३३ जागा अद्याप रिक्त आहेत.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

राज्य अनलॉकनंतर प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला होता. मात्र, शाळा कधी सुरू होणार? याबाबत पालकांमध्ये संभ्रम कायम राहिल्याने पुन्हा प्रवेशाचा वेग मंदावला असून जुलै ते जानेवारी प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने शिक्षण विभागाची डोके दुखी वाढली आहे. दरम्यान, शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएस द्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जात आहे. मात्र, पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता वेळोवेळी चौकशी करावी. तसेच निर्धारित वेळेत प्रवेश निश्‍चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 January last date of admission through RTE in state