राज्यात साडेपाच महिन्यांत 20 जणांचे बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

नागपूर : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही वर्षांत वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र कमी झाले. त्याचा सर्वाधिक फटका विदर्भातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांना बसत आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यात वाघ आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 20 जणांचा जीव गेला. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हल्ल्यात दगावलेल्यांच्या संख्येचा आलेख वाढला आहे.

राज्याच्या विविध भागात जंगलाशेजारील गावालगत मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहेत. सांगलीजवळ मगर तर विदर्भात वाघ-बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गावकरी दहशतीत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 17 जणांचा जीव गेला. शेतजमिनीचा विस्तार, नागरी जीवन आणि मूलभूत विकासावर भर दिला. यासोबत वाघांचे जतन हा मुद्दा विचारात घेतला गेला. मात्र, मानव-वन्यजीव संघर्षाकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. यावर गांभीर्याने विचार न केल्यास यात अजून वाढ होईल, असे जाणकार सांगतात.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतीला सोलर फेन्सिंगसाठी तरतूद केली. या उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिक जंगलात अथवा शेतात काम करतानाही वन्यप्राणी हल्ला करतात. वर्धा जिल्ह्यातील धानोली शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 17 घटना घडल्या. सिंदेवाही तालुक्‍यातील वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मागील पंधरा दिवसांत चार बळी गेल्याचे समोर आले. गडबोरी येथे बिबट्याने दोघांचे बळी घेतले. त्यानंतर मुरमाडीत एक जीव गेला. गुंजेवाहीच्या जंगलात वाघाने वनमजुरावर हल्ला केला. गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक एक घटना घडली. 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये कमी घटना घडल्या असल्या तरी यंदा हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 people killed in the state in the last 5 and half months