
Crime News : अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार प्रकरणी २० वर्षे कारावास !
बुलडाणा : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पुण्याला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी प्रदीप उर्फ गोलू फकीरा तारगे याला २० वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
बुलडाणा येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 2 एप्रिल 2018 रोजी घराबाहेर पडली व सायंकाळपर्यंत परत आली नाही. त्यामुळे घरच्यांनी आपल्या मुलीला पळवून नेले असल्याचा संशय असल्याची तक्रार बुलडाणा पोलिसात दाखल केली होती.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी ही पुणे येथील एका ठिकाणी आरोपी प्रदीप उर्फ गोलू तारगे याच्यासोबत आढळून आली. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी त्याला बुलडाण्यात आणल्यावर जबाब नोंदविला.
त्यावेळी त्याने अत्याचार केल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या प्रकरणी 10 साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या.
त्यामध्ये फिर्यादी, पीडिता हे दोघे व पिडितेचे नातेवाईक यांची पुरावे झाले. वैद्यकीय अहवाल व साक्षीपुरांच्या आधारे न्यायालयाने आरोपी प्रदीप उर्फ गोलू यास वीस वर्षे सश्रम कारावास व विविध कलमानुसार तीन हजार रुपये दंडाची शिक्षा एक महिना कारावास असे नमूद करण्यात आले आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी बाजू मांडली.