धवड यांच्या जामिनाला पोलिसांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

नागपूर : माजी आमदार अशोक धवड आणि त्यांची पत्नी किरण धवड यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. शिवाय प्रकरणाचा तपास सुरू असून, आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपास प्रभावित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली. त्यांच्या अर्जांवर आता 25 जुलैला सुनावणी होईल. 2010 ते 2015 या काळात नवोदय बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या ठरावीक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले.

नागपूर : माजी आमदार अशोक धवड आणि त्यांची पत्नी किरण धवड यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. शिवाय प्रकरणाचा तपास सुरू असून, आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपास प्रभावित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली. त्यांच्या अर्जांवर आता 25 जुलैला सुनावणी होईल. 2010 ते 2015 या काळात नवोदय बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या ठरावीक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले. तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन त्यांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेवून संचालक मंडळाने कर्जदारांना कर्जपुरवठा केला. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बॅंकेतून पैशांची उचल केली, तसेच रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्यानंतरही पदधिकाऱ्यांनी बॅंकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले. अशाप्रकारे आरोपींनी 38 कोटी 75 लाख 20 हजार 641 रुपयांचा गैरव्यवहार केला. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीनंतर धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत असून, अशोक धवड यांच्यासह 40 वर आरोपी आहेत. त्यापैकी सात आरोपींना अटक केली असून, धवड दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. तेव्हापासून ते फरार आहेत. त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली. या अर्जात पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींच्या जामिनाला विरोध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा