जिजाऊंच्या मतदारसंघात पुन्हा जातीय समीकरण?

मुशीरखान कोटकर
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सिंदखेडराजा : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. राज्यस्तरावर प्रमुख राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या नावाखाली यात्रा काढून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेडराजा मतदारसंघात आगामी निवडणुकीचे स्वरूप कसे राहील?, भाजप-सेना स्वतंत्रपणे लढतील का?, वंचित आघाडीचा उमेदवार कोण असेल?, ऐनवेळी बंडखोरी करून तिकीट मिळविण्यात कोण यशस्वी होतो?, याबरोबरच जातीचे समीकरण आपल्यासाठी कसे सोयीस्कर राहते, याबाबत व्यूहरचना आखण्यासाठी राजकीय मातब्बर सक्रिय झाले आहेत.

सिंदखेडराजा : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. राज्यस्तरावर प्रमुख राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या नावाखाली यात्रा काढून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेडराजा मतदारसंघात आगामी निवडणुकीचे स्वरूप कसे राहील?, भाजप-सेना स्वतंत्रपणे लढतील का?, वंचित आघाडीचा उमेदवार कोण असेल?, ऐनवेळी बंडखोरी करून तिकीट मिळविण्यात कोण यशस्वी होतो?, याबरोबरच जातीचे समीकरण आपल्यासाठी कसे सोयीस्कर राहते, याबाबत व्यूहरचना आखण्यासाठी राजकीय मातब्बर सक्रिय झाले आहेत.
लोकसभा असो की विधानसभा निवडणुका विकासाच्या मुद्यावर लढायला हव्या. आपल्या विभागाचा विकास घडवून आणणारा दृष्टी असलेला लोकप्रतिनिधी निवडून यावा, असे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात राजकीय नेते आपल्या हितासाठी पक्षांतर करून हित साधतात. त्याचप्रमाणे निवडणुकीत जातीय समीकरणामुळे कसा लाभ घेता येईल? या फंड्यालाही महत्त्व आले आहे. गत अनेक निवडणुकीपासून सिंदखेडराजा मतदारसंघावर जातीयवादाचा ठपका ठेवल्या जात आहे.
2014 पूर्वी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सलग चारवेळा विधानसभेचा गड राखण्यात राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना यश आले. मात्र, जिल्हा बॅंकेच्या मुद्द्यावरून त्यांनी आमदारकी न लढवण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच जिजाऊंच्या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला. दोनवेळेस पराभव पत्करल्यानंतर शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विजयश्री खेचून आणली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात इच्छुक उमेदवारही आता सक्रिय होत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला मेळावा घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवाराची चाचपणी केली. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सविता मुंडे यांच्या पुढाकाराने ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात मेळावा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाल्याने वंचितांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. वंचितांची एक गठ्ठा मते आणि वंजारी समाजातील उमेदवार देऊन इतिहास घडविण्याच्या प्रयत्न वंचित बहुजन आघाडीमार्फत सुरू झाले आहे. हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीला सुटलेला असल्याने कॉंग्रेसमध्ये उमेदवार शोधण्याचा प्रश्न नाही. तरीही ज्येष्ठ नेते अनिल सावजी यांनी पक्षश्रेष्ठींकडे सदर जागा कॉंग्रेसकडे ओढून घ्या, अशी मागणी केली आहे. तर मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या उमेदवारांची सिंदखेडराजा येथे मुलाखत घेतली. मुलाखतीत सिंदखेडराजा मतदारसंघासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यादृष्टीने डॉ. शिंगणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप सेना एकत्रित लढतील, अशी संभावना सद्यस्थितीत वाटत असली तरी मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघत असलेल्या प्रचार यात्रानंतर राजकीय समीकरण बदलले तर मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे. मतदारसंघातील एकंदरीत परिस्थिती बघता सध्यातरी सेना-भाजप राष्ट्रवादी व वंचित आघाडी सर्वच राजकीय पक्ष जातीचे समीकरण ओळखून सावधपणे पाऊल टाकताना दिसत आहेत.
येत्या काळात राज्याच्या राजकीय घडामोडीनंतर सिंदखेडराजा मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते. तिकीट मिळविण्याच्या लालसेपोटी कोण, कोणत्या पक्षात कोलांटउडी मारून बंडखोरी करतो, यावर विधानसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

- मिळालेली मते

- 2009
1. डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे, राष्ट्रवादी 81,808
2. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना 57,658
3. विनोद लक्ष्मण वाघ, मनसे 24,833

- 2014
1. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना 64,203
2. रेखा खेडेकर, राष्ट्रवादी 37,161
3. डॉ. गणेश मांटे, भाजप 45,349


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा