Vidhan Sabha 2019 : खोडके कुटुंबातच झाली खरीखुरी "आघाडी'

File photo
File photo

अमरावती : टोकाच्या संघर्षानंतर सुलभा खोडके यांनी अमरावतीतून कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. सुलभाताई तर लगेच राष्ट्रवादीतून कॉंग्रेसमध्ये आल्या; पण त्यांचे पती संजय खोडके अजून राष्ट्रवादीतच आहे. ईतकेच नाही तर प्रदेश सरचिटणीसही आहेत. त्यामुळे खोडकेंच्या घरातच खऱ्या अर्थाने आघाडी अस्तित्वात आल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
खोडके दाम्पत्य अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच होते. सुलभा खोडके यांना गतवेळी बडनेऱ्यातून कॉंग्रेसचे तिकीट मिळाले. त्यामुळे दोघेही कॉंग्रेसमध्ये गेले. सुलभाताई पराभूत झाल्या व हे दाम्पत्य परत स्वगृही राष्ट्रवादीत आले. यंदा पुन्हा सुलभा खोडके यांनी अमरावतीतून राष्ट्रवादीची तिकीट मागितली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर कॉंग्रेसजनांचा त्याला तीव्र विरोध होता. आघाडीत विदर्भात सर्वाधिक संघर्ष या मतदारसंघासाठीच झाला होता.
हा मतदारसंघ मिळवण्याकरिता आघाडीतील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष झाला... रस्सीखेच झाली... प्रदेश पातळीवरच नव्हे तर हा संघर्ष दिल्ली दरबारातही चांगलाच पेटला. या विषयावरून गेली पंधरा दिवस अमरावती मतदारसंघासाठी उत्सुकता ताणल्या गेली होती. दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांची खलबते व काथ्याकूट या मतदारसंघावर बरेच दिवस चालला. अखेर कॉंग्रेसला विजय मिळाला. प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही आग्रह कायम ठेवत अमरावती पक्षाकडेच कायम ठेवण्यावर भर देत तो कॉंग्रेस हायकमांडला गळी उतरविला. अखेर अमरावती कॉंग्रेसला कायम ठेवण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही नंतर आग्रह सोडून देत उमेदवारीविषयी चर्चा रेटली व कॉंग्रेसच्या प्रदेश व दिल्लीश्‍वरांनी सुलभा खोडकेंच्या नावास पसंती दिली. त्यांचे नाव कॉंग्रेसच्या अखेरच्या यादीत जाहीर झाले. राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्याला संमती दिली. अशा रीतीने सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार झाल्या व आघाडीतील वादावर पडदा पडण्यासोबतच दोन्ही पक्षांमधील रस्सीखेचही संपली. उमेदवारी मिळाल्याने सुलभाताई लगेच कॉंग्रेसी झाल्यात; मात्र, पती संजय खोडके राष्ट्रवादीतच कायम राहिले.

अदलाबदलीचा अनोखा प्रयोग
राष्ट्रवादीने जिल्ह्यात केवळ अमरावती याच मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. मोर्शी स्वाभिमानी शेतकरी संघटना व दर्यापूर रिपाइं (गवई) या घटक पक्षाला सोडण्याचे सूत्र ठरले होते. मात्र, अमरावतीच्या तणावातच राष्ट्रवादीला मेळघाट मतदारसंघ सोडण्यात आला. इथे कॉंग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मतदारसंघांची अदलाबदल करतानाच उमेदवारही बदलले. अमरावतीत राष्ट्रवादीचे उमेदवार कॉंग्रेसचे व मेळघाटात कॉंग्रेसचे उमेदवार राष्ट्रवादीचे झाले. हा आगळावेगळा प्रयोग अमरावतीत पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com