अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई; २२४ आरोपींना अटक, १७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

नीलेश डोये
Sunday, 29 November 2020

लॉकडाउनमुळे शासनाच्या महसुलावर परिणाम झाला. लॉकडाउन शिथिल करताना पहिल्या टप्प्यातच दारूविक्रीस परवानगी देण्यात आली. या काळात दुकानदारांकडून लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली.

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत २२४ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

लॉकडाउनमुळे शासनाच्या महसुलावर परिणाम झाला. लॉकडाउन शिथिल करताना पहिल्या टप्प्यातच दारूविक्रीस परवानगी देण्यात आली. या काळात दुकानदारांकडून लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक दुकानांवर कारवाई करण्यात आली. बंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी एका वाहनातून दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या. ही दारू चंद्रपूरला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचार तोफा थंडावल्या, काउंटडाऊन सुरू

दारूची अवैध विक्री करण्यासोबत नियमांचा भंग करणाऱ्या परवानाधारकांवर कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले. यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. नोव्हेंबर महिन्यात अवैध दारूच्या २११ प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत २२४ आरोपींना अटक केली. १० वाहनही जप्त करण्यात आले. या कारवाईत १७ लाख ४० हजार ६४८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या काही वर्षात अवैध दारू विक्रेत्यांवरील कारवाईत वाढ झाली. तसेच ढाबे, सावजीत अवैधरीत्या दारू पिणाऱ्यांवरही कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात झाली. 

हेही वाचा - प्रत्येकाच्या मागे ईडी लागलीय, संपूर्ण ताकदीनिशी सामना...

काहींना कारणे दाखवा -
शासनाला महसूल देणाऱ्या विभागात उत्पादन शुल्क विभागाचा समावेश आहे. नागपूर जिल्हातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळते. त्यामुळे वरिष्ठांचे नागपूरवर लक्ष आहे. योग्य प्रकारे काम होत नसल्याने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा बजावण्यात आल्याचे समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 224 accused arrested in illegal liquor selling in nagpur