बाजार विभागाचे अडीच कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नागपूर : संत्रामार्केट येथे 2002 पासून दुकाने थाटून व्यावसायिकांनी महापालिकेला कुठलाही वापर शुल्क दिला नाही. आता विद्युत मीटर लावले तेव्हापासून अर्थात 2010 पासून वापर शुल्क देण्याची तयारी व्यावसायिकांनी दर्शविली. त्यामुळे महापालिकेचे अडीच कोटींचे नुकसान होत असून, व्यावसायिकांची बाजार विभागाने कुठलीही तपासणी केली नसल्याचेही पुढे आले आहे. नुकसानासाठी जबाबदार कोण, असा प्रश्‍न पडला असून, स्थायी समिती बाजार विभागाला जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी पत्र देणार आहे.

संत्रा मार्केट परिसरात आयआरडीपीअंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी 236 दुकाने तोडण्यात आली. मात्र, त्यांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे दुकानदारांनी स्वतःच याच परिसरात दुकाने थाटली. महापालिकेनेच दुकाने तोडल्यामुळे त्यांच्याकडून वापर शुल्क वापरणेही बंद करण्यात आले. दुकानदार 2002 पासून या जागेचा वापर करीत असले तरी महापालिकेने त्यांच्याकडून वापर शुल्क घेतले नाही. 2015-16मध्ये त्यांच्याकडे वापर शुल्काची मागणी करण्यात आली.
सध्या ही जागा महामेट्रोला दिली असून, व्यावसायिकांना हिंदी भाषी संघ शाळेच्या परिसरात शेड बांधून देण्यात आले. आता 2002 पासून वापर शुल्क आकारू नये. ही दुकाने 2008-09 या कालावधीत बांधली असून, 2010 पासून वीजमीटर असल्याने तेव्हापासून वापरशुल्क देण्यास व्यावसायिकांनी तयारी दर्शविली. स्थायी समितीने शुक्रवारी 2010 पासून वापर शुल्क आकारण्यास मंजुरी दिली. 2002 ते 2009 पर्यंत वापर शुल्क माफ करण्याची तयारीच स्थायी समिती दर्शविली. मात्र, व्यावसायिकांनी ही जागा केव्हापासून वापरली की वापरली नाही? याबाबत प्रश्‍न उपस्थित करताच स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांच्याकडे उत्तर नव्हते. त्यांनी 2002 ते 09 पर्यंत एकूण दोन कोटी 46 लाखांच्या नुकसानासाठी जबाबदारी निश्‍चित करण्याबाबत बाजार विभागाला पत्र देणार असल्याचे सांगितले. व्यावसायिक 2010 पासूनचा वापर शुल्क जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत त्या रकमेवरील दंडही माफ होणार नाही, असेही स्थायी समितीने स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2.5 crore losses in market segment