धक्‍कादायक... विदर्भात 250 कोटींचा व्यवसाय बुडाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नागपूर : परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान, नोकरीत अस्थिरता आणि वाढलेल्या बेरोजगारीमुळे दिवाळीवर मंदीची छाया दिसून आली. बाजारात खरेदीचा उत्साह सुमार असल्याने विदर्भात 200 ते 250 कोटींच्या व्यवसायाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 
दसऱ्यानंतर बाजारात शेतातील माल येण्यास सुरुवात होते. यामुळे शेतकरी, हमाल आणि रोजदारांना नियमित काम मिळते. त्यातून बाजारातील पैशाची तरलता वाढते. मात्र, यंदा परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शेतातील तोडून ठेवलेली पिके बाजारात आलीच नाहीत. त्यामुळे शेतकरी पुरता बुडाला असून, याचा फटका सर्वच व्यवसायाला बसत आहे. 

लहान गावातील व्यावसायिक कर्ज घेऊन शहरात येतात. रस्त्याच्या कडेला व ठेल्यांवर दिवाळीला लागणाऱ्या साहित्यांची विक्री करतात. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावरच पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका पारंपरिक आणि रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांना बसला. कर्ज घेऊन विक्रीसाठी साहित्यांची खरेदी केलेल्या वस्तूंची विक्रीच झाली नाही. त्यामुळे गुंतवणूक केलेली मूळ रक्कमही त्यांच्या हातात आली नाही. परिणामी, त्यांच्यावरील कर्जाचा बोझा वाढला. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री न झाल्याने बाजारात पैशाची तरलता आली नाही. त्यामुळेच यंदा बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी होती. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईल. मात्र, अद्याप सरकार स्थापन न झाल्याने सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. शेतकरी चिंतेत सापडला असून, त्यांची आर्थिक कोंडीही झाली आहे. 
नोकरदारांनाही मोजकाच पैसा हातात येतो. त्यातील बहुतांश वाटा गृह, इतर साहित्यासाठी घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्त्यांच्या परताव्यासाठी खर्च होतो. वाढलेली महागाई आणि बेरोजगारीच्या चिंतेमुळे नोकरदारही अडचणीत आहेत. वाढलेल्या महागाईमुळे ग्राहकांनी केलेली बचतही म्युच्युअल फंड, एसआयपीमध्ये जमा केली जात आहे. त्यांच्याकडेही खर्च करण्यासाठी अतिरिक्त रक्कम शिल्लक नाही. त्यामुळेच ग्राहकांनी दिवाळीला पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीवर भर दिला. परिणामी, दिवाळीत विदर्भातील सरासरी 200 ते 250 कोटींच्या व्यापाराचे नुकसान झाले. यावरून बाजारात तरलता राहिली नसल्याचे मत बी. सी. भरतीया यांनी व्यक्त केले. 
मोठे उद्योग आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर त्यांच्या कर्जाची पुनर्रचना केली जाते. तसेच ज्यांनी घर, दुकान अथवा इतर स्थायी संपत्तीवर कर्ज घेतले त्या कर्जदारांना पुढील 24 महिन्यांसाठी मासिक हप्ते थांबवण्यात यावे. ती रक्कम पुढील 24 महिने बाजारात खर्च करण्याची सूट कर्जदाराला द्यावी. तेव्हाच बाजारात पैशाची तरलता येईल. उद्योगासह व्यवसाय वाढेल. 
बी. सी. भरतीया 
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ (कॅट). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 crore business collapses in Vidarbha