Warora News : अडीचशे भाविकांना महाप्रसादातून विषबाधा, एकाचा मृत्यू; माजरीच्या कालीमाता मंदिरातील घटना

माजरी येथील कालीमाता मंदिरात नवरात्रनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद घेतल्यानंतर अडीचशेवर भाविकांना विषबाधा झाली.
अडीचशे भाविकांना महाप्रसादातून विषबाधा
अडीचशे भाविकांना महाप्रसादातून विषबाधाSakal

वरोरा : माजरी येथील कालीमाता मंदिरात नवरात्रनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद घेतल्यानंतर अडीचशेवर भाविकांना विषबाधा झाली. यात एका वृद्धाचा मृत्यू झाला. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

वरोरा रुग्णालयातून चंद्रपूरला नेत असताना रस्त्यातच गुरुफेन यादव (वय ८० रा. माजरी) यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल शनिवारी (ता. १३) सायंकाळनंतर घडली. विषबाधा झालेल्या नागरिकांवर चंद्रपूर, माजरी, वरोरा आणि वणी येथे उपचार सुरू आहेत.

माजरी येथे कालीमाता मंदिर आहे. सध्या मंदिरात देवीचे चैत्र नवरात्र सुरू आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (ता. १३) सायंकाळी काली माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

शेकडो भाविकांनी येथून महाप्रसाद ग्रहण केला. महाप्रसाद घेतल्यानंतर भाविक घरी परतले. काही वेळानंतर रात्री अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलिच्या रुग्णालयात धाव घेतली. मात्र, माजरीतील वेकोलिच्या रुग्णालयात बेडची संख्या व सलाईनचाही साठा अपुरा होता. त्यामुळे ६० रुग्णांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विषबाधा झालेले भाविक रात्री दीडच्या सुमारास वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वखर्चाने पोहोचले. या रुग्णांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था माजरी येथील वेकोलि प्रशासनाने केली नाही.

वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. येथे उपचार घेणाऱ्या ६० रुग्णांपैकी सहा जणांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

विषबाधा झालेल्यांपैकी माजरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा जण, माजरी वेकोलिच्या रुग्णालयात २५ ते ३० जण दाखल आहे. काहीजण चंद्रपूर व वणी येथे गेल्याची माहिती आहे. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी प्रतीक बोरकर यांनी रविवार (ता. १४) सकाळी भेट दिली. रुग्णांची चौकशी केली.

गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालयात

वरोरा येथील रुग्णालयातून सहा गंभीर रुग्णांना चंद्रपूरला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना चंद्रपुरात नेत असताना गुरुफेन यादव या वृद्धाचा मार्गातच मृत्यू झाला. यादव यांना अन्य आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. चंद्रपूर येथे हलविण्यात आलेल्या अन्य रुग्णांत आर्यन राजपुता (वय ५), अभिषेक वर्मा (वय ५), आशय राम (वय ३), सोमय्या कुमार (दीड वर्ष), देवांश राम (अडीच वर्ष) यांचा समावेश आहे.

दोघांवर गुन्हे दाखल

विषबाधा होऊन गुरुफेन राम यादव यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा चंद्रहास यादव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आयोजक बुल्लू राम दर्शन राम (वय ५०), आचारी छाया मारोती तिखट (५७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कालीमाता मंदिराला भेट दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com