तुमसर शहरात चार दिवसांत २८ जणांचा मृत्यू...काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

गणेश बर्वे
Sunday, 13 September 2020

कोरोना महामारीच्या काळात संक्रमण वाढत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, ग्रामपंचायतींकडून जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, भीतीमुळे कोरोनाची तपासणी न करणाऱ्यांचीही संख्या बरीच मोठी आहे. तुमसर शहरात गेल्या चार दिवसांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद स्मशानभूमीच्या रजिस्टरमध्ये केली आहे.

तुमसर (जि. भंडारा) : तुमसर शहरामध्ये नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. येथे गेल्या चार दिवसांत तब्बल २८ जणांचा मृत्यू झाला असून यामुळे शहरांतील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक दिवशी कुणाच्या ना कुणाच्या मृत्यूची बातमी कानी पडत आहे. त्यामुळे नागरिकांनीही धसका घेतला आहे.

 

संपूर्ण जगात सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव झाला आहे. देशातील शहर व ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णाच्या संपर्कात येणारे नातेवाईक व इतरांत संसर्ग होत आहे. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे.

 

कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, ग्रामपंचायतींकडून जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, भीतीमुळे कोरोनाची तपासणी न करणाऱ्यांचीही संख्या बरीच मोठी आहे.

तुमसर शहरात गेल्या चार दिवसांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद स्मशानभूमीच्या रजिस्टरमध्ये केली आहे. हा येथील नागरिकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. शहरात गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सात जणांचा मृत्यू झाला. शनिवारी चार जणांचा झाला. आज रविवारी आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकारे मृत्यूची संख्या वाढण्याचे स्पष्ट कारण माहीत नाही. मात्र, मृतांमध्ये ४० वर्षांच्या युवकांपासून तर वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. यातील काहींना श्‍वास घेण्यास त्रास होत होता, अशी खात्रीशीर माहिती आहे.

हेही वाचा : यशोगाथा : परंपरागत व्यवसायाला दिली आधुनिकतेची जोड आणि घेतली या व्यवसायात भरारी

पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा

यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरांतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता नगर परिषदेने सोमवार ते शुक्रवारदरम्यान पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. नागरिकांनी याबाबत गंभीर विचार करून संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.

मृत्यूचे कारण संशयित

युवा वर्गासाठी कोरोना घातक नसला; तरी ते या विषाणूला वाहून नेण्याचे कार्य करतात. हाच दुष्परिणाम शहरात दिसून येत आहे. येथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मृत्यूचे कारण हे संशयित आहेत. परंतु यामध्ये हृदयविकाराचा झटका आणि श्‍वास घेण्यास त्रास हे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.

जाणून घ्या : घ्या आता... आतातरी घालाल ना मास्क, दंडामध्ये दुप्पटहून अधिक वाढ

कोरोनाबाधितांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास मनाई

तीन दिवसांपूर्वी येथील एका कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला. त्याला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करून प्लॉझ्मा लावला होता, अशी माहिती आहे. या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक येथे मृतदेह घेऊन आले. येथील स्मशानभूमीत वृद्धाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत माहिती होताच गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करून येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करू देऊ नये, अशी मागणी केली आहे. सावधानतेचा इशारा म्हणून कोरोना संक्रमित मृत व्यक्तीवर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 people died in four days in Tumsar city