कर वाचविण्याच्या नादात गमविले ३० लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

एचडीएफसी. स्टॅण्डर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये काढलेल्या पॉलिसीची रक्‍कम कर चकवून मिळविण्याच्या नादात वायगाव (निपाणी) येथील महेश बळीराम कुंभारे यांना २९ लाख ८७ हजार ८८८ रुपयांचा गंडा बसला.

वर्धा - एचडीएफसी. स्टॅण्डर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये काढलेल्या पॉलिसीची रक्‍कम कर चकवून मिळविण्याच्या नादात वायगाव (निपाणी) येथील महेश बळीराम कुंभारे यांना २९ लाख ८७ हजार ८८८ रुपयांचा गंडा बसला. हा गंडा घालणाऱ्या दिल्ली येथील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून वर्ध्यात आणले. त्यांच्याजवळून दोन लाख २२ हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अटकेतील भानुप्रताप लक्ष्मीनारायण ठाकूर, (वय २६) वर्ष, रा. केशवनगर, नवी दिल्ली हा या फसवणुकीचा मास्टर माईंड आहे. फसवणुकीतून आलेल्या रकमेचा व्यवहार करण्यासाठी त्याने प्रभास कुमार श्रीनारायणदास कुमार (वय २३) रा. गल्ली नंबर सहा, पोलिस कॉलनी बुराडी नवी दिल्ली तसेच मोहन कुमार नरेंद्र कुमार शुक्‍ला, (वय ३३) रा. नत्थुपुरा बुराडी, नवी दिल्ली यांचे बॅंक खाते भाड्याने घेतल्याचे कबूल केले. यावरून तिघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 lakhs of lost In the name of saving tax