तीनशे गावांना देणार डिजिटल सात-बारा - अनुप कुमार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - भूमिलेख अभिलेखांचे डिजिटलायझेशन होत असल्यामुळे जनतेला आवश्‍यक असलेले अभिलेख सहज आणि सुलभ होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापासून विभागातील ३०० गावांमध्ये शेतकऱ्यांना डिजिटल सात-बाराच्या वाटपाला सुरुवात होत असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात भूमी अभिलेख विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आदर्श अभिलेख कक्ष स्पर्धा २०१७-१८’ पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

या वेळी जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल, भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे, परिवीक्षाधीन अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, श्रीकृष्ण पांचाळ, विभागातील भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, एम. बी. पाटील, जी. बी. डाबेराव, अभय जोशी, पी. जी. मेश्राम आदी उपस्थित होते.

राज्यात ४३ हजार गावांपैकी ४० हजार गावांचे अचूक डिजिटल सात-बाराचे काम पूर्ण झाले आहे. देशात कर्नाटकनंतर येणाऱ्या काळात महाराष्ट्राला प्रथम स्थान मिळेल, अशी अपेक्षा भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, येत्या एक वर्षात प्रॉपर्टी कार्ड डिजिटल पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी उपाययोजना केली जात आहे.

या कार्यात यश मिळाल्यास डिजिटल प्रॉपर्टी कार्ड वितरणाची सुरुवात ही राज्यात नागपूर जिल्ह्यातून केली जाईल. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या घराघरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागात कार्य करण्यात येणार आहे.

मूल भूमी अभिलेख कार्यालय प्रथम
आदर्श अभिलेख कक्ष स्पर्धेत विभागस्तरावर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, मूलने प्रथम क्रमांक पटकावला. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. दुसरा पुरस्कार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, उमरेड तर तृतीय पुरस्कार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सालेकसा यांना अनुक्रमे ७ व ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा अधीक्षक कार्यालय गडचिरोली, उपअधीक्षक कार्यालय, भंडारा, उपअधीक्षक कार्यालय, कारंजा, उपअधीक्षक कार्यालय, सालेकसा, उपअधीक्षक कार्यालय उमरेड, उपअधीक्षक कार्यालय, मूल यांना प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: 300 village digital satbara anup kumar