गडचिरोली : अंतर्गत वादाने भाजप बहुमतापासून दूर

सुरेश नगराळे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

त्रिशंकू स्थिती
जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या असून त्या खालोखाल कॉंग्रेसने मुसंडी मारीत 15 जागा पटकविल्या. सात ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाचे उमेदवार निवडून आले. तीन अपक्ष आणि दोन ग्रामसभेला प्रतिनिधित्व मिळाल्याने बहुमतासाठी लागणारा 27 हा आकडा सध्या कोणाकडेच नसल्याने भाजप, कॉंग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होणार आहे. यात आविसची निर्णायक भूमिका राहणार आहे.

गडचिरोली : जिल्हाभरात भाजपला अनकूल वातावरण असतानाही केवळ अंतर्गत वादाने बहुमताच्या आकड्यापासून दूर राहावे लागले. 51 पैकी 20 जागा जिंकून भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, पालकमंत्र्यांच्या अहेरी मतदारसंघात 16 पैकी केवळ चारच जागा मिळाल्याने सत्तेसाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागांतही घसरण झाल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्तेसाठी आदिवासी विद्यार्थी संघ तसेच ग्रामसभेची भूमिका निर्णायक ठरेल.

नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही भाजपला फायदा होईल, असे भाकीत वर्तविले जात होते. त्यामुळे तिकीट मिळविण्यासाठी बाहेरून आलेल्या उमेदवारांनी प्रवेशासाठी गर्दी केल्याने काही जिल्हा परिषद क्षेत्रात निष्ठावंतांचा पत्ता कटला. यामुळे जवळपास दहा सदस्यांचा तोटा भाजपला सहन करावा लागला. येवली-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार उमेदवार रेखा डोळस पराभूत झाल्या. येथे लक्ष्मी कलंत्री दावेदार होत्या; मात्र त्यांना तिकीट नाकारल्याने लगतच्या तीन जिल्हा परिषद क्षेत्रात फटका बसला.

पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अहेरी मतदारसंघात भाजपला 16 पैकी केवळ चारच जागा मिळाल्या. सुरजागड प्रकल्प, मेडीगट्टा तसेच जनसंपर्कांची नाराजी भाजपला भोवली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का देत आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी मतदारसंघात सात जागा जिंकल्या. प्रतिष्ठेच्या आलापल्ली-वेलगूर जिल्हा परिषद क्षेत्रावरही आविसने कब्जा मिळविला. भामरागड व एटापल्ली तालुक्‍यात यंदा प्रथमच ग्रामसभेच्या उमेदवारांचा बोलबाला राहिला.
भामरागड पंचायत समितीमध्ये ग्रामसभेने बहुमत मिळविले असून प्रचारादरम्यान जेलमध्ये राहिलेल्या सैनू गोटाही विजयी झाले.

गडचिरोली जिल्हातील 12 पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसला चार, भाजपला पाच, आविसला एक, राकॉंला एक तर एका पंचायत समितीवर ग्रामसेभेने बहुमत मिळविले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामसभेने जिल्हा परिषदेमध्ये तर रासपने पंचायत समितीमध्ये खाते उघडले. मात्र, गेल्या निवडणुकीत सात सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेला यंदा एकाही ठिकाणी खाते उघडता आले नाही. महिला आघाडीच्या प्रमुख छाया कुंभारे ह्यासुद्धा पराभूत झाल्याने सेनेला चांगलाच फटका बसला.

जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, बंडोपंत मल्लेलवार, रवींद्र ओल्लालवार, जीवन नाट, विश्‍वास भोवते, डॉ. तामदेव दुधबळे या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर अजय कंकडालवार, अतुल गण्यारपवार यांना सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली आहे.\