संत्रा, मोसंबीसाठी 33 कोटींची मदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नागपूर : संत्रा, मोसंबी पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रशासनाने 33 कोटींचा निधी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नागपूर : संत्रा, मोसंबी पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रशासनाने 33 कोटींचा निधी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उशिरा का होईना, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खरीप 2018 च्या हंगामात कमी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि कळमेश्‍वर तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते. या दुष्काळग्रस्त भागातील पिकांना हेक्‍टरी 6 हजार 800 तर बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्‍टरी (दोन हेक्‍टरपर्यंत) 18 हजार रुपये मदत देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. शासनाने 63 कोटींची मदत दिली होती. मात्र, नागपूर जिल्ह्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचे "सकाळ'च्या वृत्तानंतर समोर आले. यावर शासनाने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. तीनही तालुक्‍यात 18 हजार 591 हेक्‍टरमधील संत्रा, मोसंबीचे नुकसान झाले असून यामुळे 22 हजार 201 शेतकऱ्यांचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी 33 कोटी 46 लाख, 38 हजार रुपयांचा मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला होता. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याचे चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना मदत करण्याची मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष महसूलमंत्र्यांना काटोल न.प.चे सत्तापक्षनेते चरणसिंग ठाकूर, काटोल पं.स.चे सभापती संदीप सरोदे, नरखेड पंसचे सभापती राजेंद्र हरणे, जिप सदस्य उकेश चौहान यांनी केली होती. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत मदती निधी जाहीर केल्याचे पत्र दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 crores help For the orange