हावडा-मुंबई मेलमधून 33 अल्पवयीन मुलांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हावडा-मुंबई मेलमधून 33 अल्पवयीन मुलांची सुटका

नागपूर : प्रवासी, स्थानिक पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हावडा-मुंबई मेलमधून 33 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात यश आले. मुले घेऊन जाणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हे मानवी तस्करीचे प्रकरण असल्याची शंका सुरक्षा यंत्रणांना असली तरी मुलांना शिक्षणासाठी नेत असल्याचा दावा ताब्यातील व्यक्तीने केला आहे. मोहम्मद शाकीर हुसैन (22) रा. माधोपूर, भागलपूर, बिहार असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे. नागपूरच्या दिशेने धडधडत निघालेल्या हावडा-मुंबई मेलच्या एस-5 क्रमांकाच्या डब्यात मोठ्या संख्येने मुले एकत्र बसून असल्याचे एका महिलेला आढळले. शंका आल्याने त्यांनी रायपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्याने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गाडी येण्यापूर्वीच राजनांदगाव स्थानकावर सापळा रचण्यात आला. 11.46 वाजता गाडी स्थानकावर येऊन थांबताच पोलिस आणि आरपीएफच्या पथकाने एस-5 डब्याची तपासणी केली. या डब्यात 26 अल्पवयीन मुले आढळली. त्यांच्यासोबतच शाकीरही हाती लागला. मुलांनी दिलेल्या माहितीवरून एस-2 क्रमांकाच्या डब्यातही झाडाझडती घेण्यात आली या डब्यात सात मुले आढळली. सर्व 33 मुले 8 ते 12 वर्षे वयोगटातील असून बिहार राज्यातील असल्याचे सांगण्यात येते. त्यांना चाइल्ड लाइन प्रतिनिधींच्या ताब्यात देण्यात आले.
ताबापत्राची माहिती नाही
शाकीरच्या दाव्यानुसार तो मुलांना घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील सहारानगर, नांदुरा येथे शिक्षणासाठी घेऊन जात होता. मुलांच्या ताबापत्राबाबत विचारणा केली असता त्याला कोणतीही माहिती सादर करता आली नाही, शैक्षणिक संस्थेचीही कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याने संशय अधिकच गडद झाला असून स्थानिक पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: 33 Minor Children Released Howrah Mumbai Mail

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top