अकोला शहरात 366 अवैध बांधकामे सुरू

amc
amc

अकोला : शहरातील चारही झोन मिळून करण्यात आलेल्या सर्व्‍हेक्षणानुसार एकूण 366 अवैध बांधकाम सुरू असल्‍याची बाब उघडकीस आली. ही माहिती नगररचना व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी महापौर अर्चना मसने यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिली. त्यानंतर नगररचना व क्षेत्रीय अधिकारी यांनी समन्‍वय साधून अनधिकृतरित्‍या करण्‍यात आलेले बांधकाम पाडण्‍याची सूचना देण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.


महापौर अर्चना मसने यांच्या उपस्थितीत नगररचना व बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत शहरात सुरू असलेल्‍या बांधकामांचा आढावा घेण्यात आला. त्यात अवैध बांधकामांची यादी सादर करण्यात आली. ही अवैध बांधकामे पाडण्याबाबत महापौरांनी सूचना दिली. त्यासाठी मंजुर नकाशाच्‍या प्रत झोन कार्यालयाला देणे आणि त्यानुसार अनधिकृत बांधकामासंदर्भात झोन निहाय यादी तयार करण्याची सूचना करण्यात आली.अनधिकृत बांधकाम पाडण्‍या आधी न्‍यायालयात कॅव्‍हॅट दाखल करण्‍यासंदर्भातही सांगण्यात आले. या आढावा बैठकीत उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी महापौर विजय अग्रवाल, मनपा उपायुक्‍त वैभव आवारे, क्षेत्रीय अधिकारी पुनम कळंबे, प्रशांत राजुरकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत मसने, सागर शेगोकार, दिलीप मिश्रा, नगररचनाकार उदय तारळेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, सहा.नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे व नगररचना विभागातील उपअभियंते, कनिष्‍ठ अभियंते यांची उपस्थिती होती.


घरकुल व रस्ते विकासाचा आढावा
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्‍या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सुरू असलेल्‍या घरकुलांच्‍या बांधकाम परवानगी संदर्भातील तांत्रिक अडचणी बाबत त्‍वरीत कार्यवाही करण्‍या‍करिता सूचना देण्‍यात आल्‍यात. हद्दावाढीच्या परिसरातील मुख्‍य रस्‍त्‍यांवर कलव्‍हर्ट बांधकामाबाबत सूचित करण्‍यात आले. चारही झोन निहाय हद्दवाढ भागातील सुरू असलेल्‍या डांबरीकरण व कॉक्रीटीकरणच्‍या कामा बाबतचा आढावा घेण्‍यात आला.


आयुक्तांची अनुपस्थिती खटकली
बांधकाम व नगररचना विभागाच्या आढावा बैठकीत अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चेला येणार होता. नेमके महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी एकच दिवस काम केल्यानंतर मंगळवारी सुटी घेतली. त्यांच्या सुटीतच पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक आयोजित का केली याबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com