Maharahstra vidhansabha 2019 महामंच विदर्भात लढणार 40 जागा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नागपूर :  लोकसभा निवडणुकीच्या आधीच विदर्भवाद्यांचा महामंच तयार झाला आहे. येत्या विधानसभेत आम्ही एकत्रित 40 जागांवर लढणार असून, कॉंग्रेसने विदर्भाच्या मुद्यावर आमच्यासोबत आल्यास भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचे भाकीत श्रीहरी अणे यांनी वर्तविले.

नागपूर :  लोकसभा निवडणुकीच्या आधीच विदर्भवाद्यांचा महामंच तयार झाला आहे. येत्या विधानसभेत आम्ही एकत्रित 40 जागांवर लढणार असून, कॉंग्रेसने विदर्भाच्या मुद्यावर आमच्यासोबत आल्यास भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचे भाकीत श्रीहरी अणे यांनी वर्तविले.
विदर्भ राज्य आघाडीचा वर्धापनदिन आज उत्तर अंबाझरी मार्गावरील आंध्र असोसिएशनच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अणे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसची वाताहत झाली आहे. मात्र, विदर्भात अद्याप कॉंग्रेस भक्कम स्थितीत आहे. ग्रामीण भागात भाजपपेक्षा कॉंग्रेस अधिक मजबूत आहे. फक्त सर्वांनी विदर्भाच्या मुद्यावर एकत्र येण्याची गरज आहे. कॉंग्रेसने विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने येथेही पक्ष दिवसेंदिवस कमजोर होत आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्रात मुंबईत स्वतंत्र कॉंग्रेस कमिटी आहे. त्याप्रमाणे विदर्भ कॉंग्रेस कमिटी स्थापन करावी. विदर्भाचा मुद्दा कॉंग्रेसने आपल्या अजेंड्यावर घेतल्यास सोबत राहू. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात विदर्भ होता. त्यामुळे आम्ही भाजपला पाठिंबा दिला. त्यांनी धोका दिल्याने यावेळी आम्ही विरोधात लढणार असल्याचेही अणे यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या चळवळीत सध्याही चढ-उतार सुरू आहे. आमचा महामंच सत्ताधाऱ्यांना टक्कर देणारा पक्ष नाही, याची जाणीव आहे. आमची ताकद कमी पडणार, पण म्हणून लढायचेच नाही का, असा प्रश्‍न करीत निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. विदर्भ राज्य आघाडीत वामनराव चटप यांची विदर्भ राज्य आंदोलन समिती, बीआरएसपी, जनसुराज्य पक्ष, राजकुमार तिरपुडेंच्या विदर्भ माझाचा समावेश आहे.
...म्हणून देवडियात गेलो
कॉंग्रेसच्या देवडिया भवनात गेल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. याबाबत विचारणा केली असता, 1962 मध्ये रिखबचंद शर्मा यांच्या प्रचारासाठी जवाहरलाल नेहरू नागपुरात आले होते. त्यावेळी लोकनायक बापूजी अणे आणि नेहरूजींची भेट विमानतळावर झाली होती. तेव्हाचा एक फोटो माझ्याकडे होता. लोकनायकांच्या इच्छेप्रमाणे तो कॉंग्रेसला भेट द्यायचा होता. त्यासाठी मी कॉंग्रेसच्या कार्यक्रमाला गेलो होतो, असे अणे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 seats in Mahachana Vidarbha