41 रेल्वेस्थानकांवर प्री-फेब्रिकेटेड टॉयलेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

रेल्वेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटीअंतर्गत रेल्वेस्थानकांवर प्रवासी सुविधा उभारण्याचे धोरण तयार केले आहे. देशातील एकूण 529 रेल्वेस्थानकांवर प्री-फेब्रिकेटेड टॉयलेट लावले जाणार आहे. या उपक्रमावर 128.58 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नागपूर : साउथ इस्टर्न कोल फिल्ड्‌स लिमिटेडतर्फे (एसईसीएल) कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील 41 रेल्वेस्थानकांवर "प्री-फेब्रिकेटेड टॉयलेट' उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाशी संबंधित करारावर नुकतेच रेल्वे आणि एसईसीएलदरम्यान द्विपक्षीय करार पार पडला. 
रेल्वेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटीअंतर्गत रेल्वेस्थानकांवर प्रवासी सुविधा उभारण्याचे धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या प्रवासी सुविधांसाठी रेल्वेला निधी देऊ शकतील. या निधीतून प्रामुख्याने प्रसाधनगृह, नि:शुल्क वायफाय, ई-सेवा, प्लॅस्टिक बॉटल क्रशर मशीन, स्टील बेंच आणि डस्टबिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. एसईसीएलच्या सहकार्याने रेल्वे स्थानकांच्या परिसरात प्री-फेब्रिकेटेड टॉयलेटची उभारणी केली जाईल. प्रत्येक स्थानकावर तीन महिला व तीन पुरुष प्रसाधनगृहांसह दिव्यांग प्रसाधनगृह राहील. या उपक्रमाशी संबंधित करारावर रेल्वेतर्फे मुख्य अभियंता प्रदीप गुप्ता, एसईसीएलचे महाव्यवस्थापक असीत कुमार पाढी यांनी स्वाक्षरी केल्या. याप्रसंगी रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक व मुख्य जनसंपर्क अधिकारी साकेत रंजन, उपमहाव्यवस्थापक सी. एच. गौवरैया, संतोष कुमार, एम. के. सुबुद्धी उपस्थित होते. 
देशभरातील 529 स्थानकांवर प्रसाधनगृहे 
एसईसीएलतर्फे देशातील एकूण 529 रेल्वेस्थानकांवर प्री-फेब्रिकेटेड टॉयलेट लावले जाणार आहे. या उपक्रमावर 128.58 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत असणाऱ्या एकूण 147 स्थानकांवर टॉयलेट लावले जाणार आहेत. त्यातील नागपूर विभागात 41, बिलासपूर विभागात 76 तर रायपूर विभागात 30 रेल्वेस्थानकांवर ही सुविधा केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 Pre-fabricated toilets at the train station