आता शेतकऱ्यांभोवती फवारणीचा फास; या जिल्ह्यात ४२ जण किटकनाशकाने बाधित 

insectiside
insectiside

यवतमाळ : खरीप हंगामात कपाशी व सोयाबीनची वाढ होत असतानाच पिकांवर किडीचे आक्रमण होत आहे. त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करीत आहेत. मिक्‍स औषध फवारले जात असल्याने यंदाही शेतकऱ्यांभोवती फवारणीचा फास कायम आहे. या हंगामात आतापर्यंत शनिवारी (ता.पाच) एकूण 42 शेतकरी व शेतमजुरांना बाधा झाली आहे.

कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू असतानाच शेतकरी आर्थिक अडचणीवर मात करून खरीप हंगामाच्या तयारीला लागलेत. त्यातही सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची वाढ होत असतानाच सोयाबीन व कपाशी पिकांवर रोगाचे आक्रमण झाले. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कीटकनाशक औषध फवारणीचा पर्याय निवडला. मात्र, फवारणीबाबत शेतकरी व शेतमजूर अजूनही अनभिज्ञ आहेत. तांत्रिकदृष्ट्या फवारणी कशी करावी, याची जनजागृती ग्रामीण भागात झाली नाही. त्यामुळे फवारणी करताना 42 शेतकरी व शेतमजूर बाधित झालेत. त्यांच्यावर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आलेत. 

राळेगाव तालुक्‍यातील एका बाधिताचा शासकीय रुग्णालयात तर, एकाचा परजिल्ह्यात मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाकडे दोन्ही मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी चंद्रपूर, नांदेड, सावंगी (मेघे), सेवाग्राम येथे उपचारासाठी धाव घेतात. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या जास्तच आहे. सुरक्षित फवारणीबाबत कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना केवळ कागदी घोडे नाचविण्यात येते. परिणामी खरीप हंगामातील कीटकनाशक फवारणी शेतकऱ्यांसाठी घातक ठरते. या हंगामात फवारणीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "ऍक्‍शन प्लॅन' तयार करणे आवश्‍यक आहे.

ही काळजी आवश्‍यकच

कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणूनच करायला पाहिजे. लाल व पिवळा त्रिकोण असलेल्या औषधींचा वापर टाळावा. हिरवा व निळा त्रिकोण असलेली कीटकनाशक निवडावी. ही औषधी कमी विषारी असतात. फवारणीच्या पाण्याचा सामू ६-७ दरम्यान असावा. द्रावण तयार करताना हातमोजे, मास्क व चष्मा वापरावा. फवारणी सकाळी किंवा सायंकाळच्या सुमारास करावी. दुपारी प्रखर उन्हात, ढगाळ वातावरणात फवारणी टाळावी. वाऱ्याची दिशा ओळखून फवारणी करावी. फवारणीदरम्यान कोणत्याही खाद्य पदार्थाचे सेवन करू नये. उपाशी पोटी फवारणी करू नये. फवारणीदरम्यान वापरलेले कपडे स्वच्छ धुवावे व स्वच्छ अंग पुसून अंघोळ करावी, कीटकनाशकांचे रिकामे डब्बे, बॉटल उघड्यावर शेतात फेकू नये, योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावावी, आदी प्रकारे शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे.

आतापर्यंत 42 फवारणीबाधित उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेत. उपचारानंतर बरे झालेल्यांना सुटी देण्यात आली. सध्या सहा बाधितांवर उपचार सुरू असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. औषधांचे मिश्रण करून फवारणी केली जाते. योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. 
-डॉ. बाबा येलके
औषधशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.


केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारस केलेल्या औषधांचा वापर काळजीपूर्वक करावा. वेगवेगळी रसायने मिसळून फवारणी करणे टाळायला पाहिजे. फवारणी करताना डोळ्यावर गॉगल, हातमोजे, मास्क, डोक्‍यावर टोपी, ऍप्रोन, बूट घालूनच फवारणी करावी. शेतमजूर सलग फवारणी करतात, हे चुकीचे आहे. योग्य काळजी घेतल्यास बाधा टाळता येऊ शकते. 
- डॉ. प्रमोद मगर
शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र), केव्हीके, यवतमाळ.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com