esakal | खुशखबर! दिवाळीपूर्वी ४९ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

49 thousand farmers to get help before Diwali in yavatmal

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे पेरणीमध्ये अनेकदा व्यत्यय आला. त्यातच पेरणी सुरू केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली.

खुशखबर! दिवाळीपूर्वी ४९ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात 34 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल 49 हजार 256 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांत दिवाळीपूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे पेरणीमध्ये अनेकदा व्यत्यय आला. त्यातच पेरणी सुरू केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पेरण्या कशाबशा आटोपल्या असतानाच जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने थैमान घातले. त्यामुळे दारव्हा व नेर या तालुक्‍यांतील शेतपिके खरडून गेलीत. विविध तालुक्‍यांतील पिकांनादेखील फटका बसला. या संकटांतून शेतकरी बाहेर येत नाहीत व पिके जोमात असतानाच ऐनकाढणीच्या वेळी सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांत पावसाने झोडपून काढले. संततधारमुळे सोयाबीनला अक्षरक्षः कोंब फुटलीत, तर कापसाची बोंडेही सडली.

हेही वाचा - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला...

कापूस, सोयाबीनसोबतच तूर, उडीद, मूग या शेतपिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने जून ते ऑगस्ट या कालावधीत नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. त्यात बाधित क्षेत्र दोन हजार 926 हेक्‍टर एवढे आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांमधील शेतपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामध्ये 34 हजार हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीमुळे 49 हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. प्रशासनाने 24 कोटी 27 लाख 43 हजार रुपयांचा मदतनिधी मागणीचा प्रस्ताव पाठविला होता. शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड असले तरी मदतीमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा पक्षीसप्ताह: यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 343 पक्ष्यांची...

तालुकानिहाय शेतकऱ्यांची संख्या -

 • कळंब-268
 • घाटंजी-96
 • राळेगाव-1,762
 • दारव्हा-24,185
 • नेर-621
 • बाभूळगाव-745
 • पुसद-300
 • दिग्रस-8,935
 • उमरखेड-2,863
 • महागाव-6,389
 • पांढरकवडा-247
 • वणी-1,592
 • मारेगाव-434
 • झरी-235

आचारसंहितेची अडचणी येण्याची शक्‍यता कमी -
अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात आचारसंहिता लागू आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात अडचणी येईल, अशी चर्चा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता अडचण येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचण्याची शक्‍यता आहे.